पंतप्रधान मोदी हे न केलेल्या कामाचे श्रेय घेण्यात तरबेज आहेत, सुशीलकुमार शिंदे यांनी केली सोलापूरात टिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 12:22 PM2018-01-09T12:22:11+5:302018-01-09T12:44:14+5:30
काँग्रेस सरकारच्या काळात अनेक विकासाच्या योजना झाल्या ,पण आम्ही त्याचे कधी मार्केटिग केले नाही , याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांनी न केलेल्या कामाची उदघाटने करीत श्रेय लाटतात ,अशी टीका माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ९ : काँग्रेस सरकारच्या काळात अनेक विकासाच्या योजना झाल्या ,पण आम्ही त्याचे कधी मार्केटिग केले नाही , याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांनी न केलेल्या कामाची उदघाटने करीत श्रेय लाटतात ,अशी टीका माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली.
अक्कलकोट तालुक्यातील चुंगी येथे आयोजित कार्यक्रमात शिंदे बोलत होते. उत्कर्ष सार्वजनिक वाचनालयाच्या विस्तारीत इमारतीचे उदघाटन शिंदे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी अक्कलकोटचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे होते. सोलापूर लोकमतचे संपादक राजा माने यांच्यासह लोकप्रतिनिधीची यावेळी उपस्थिती होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीचा समाचार घेताना शिंदे म्हणाले , सोलापूर-पुणे हा राष्ट्रीय महामार्ग मी पाठपुरावा करून मंजूर करून घेतला ,त्याचे उदघाटन मात्र पंतप्रधानांनी केले ,अशी अनेक उदाहरणे शिंदे यांनी दिली. त्यांच्या भाषणाचा धागा पकडीत आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनीही स्थानिक भाजपा नेत्यांचा समाचार घेतला. कुरनुर धरण पोटनिवडणुकीत निवडून आल्यानंतर तीन महिन्यांनी सुरू झाले ,पण त्याचे श्रेय ही मंडळी तत्कालीन भाजपा आमदारांना देतात , आजही अककलकोटमध्ये हाच प्रकार सुरू आहे.न केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याची परंपरा भाजपात आहे ,ती वरपासून पाळली जाते अशी कोपरखळी म्हेत्रे यांनी मारली.
वाचनालयाचे संस्थापक प पू गोरक्षनाथ महाराज यांनी मान्यवरांचा सत्कार केला़ अध्यक्ष नारायण चव्हाण यांनी प्रास्तविकातून वाचनालयाच्या वाटचालीचा आढावा घेतला. यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, सोलापूर मनपा पक्षनेते चेतन नरोटे , डिसीसी बँकेचे संचालक सुरेश हसापुरे , युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुदीप चाकोते ,श्रीशैल नारोळे ,सरपंच आशाराणी गड्डे ,प्रहार जनशक्तीचे राजसाहेब चव्हाण यांची उपस्थिती होती़