वीज वितरणच्या विरोधात शेतकºयांचा आक्रोश, उपरी येथे रस्ता रोको, थकीत वीज बिलासाठी मुदतवाढ देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 05:42 PM2018-01-08T17:42:50+5:302018-01-08T17:45:49+5:30
उपरी (ता. पंढरपूर) व परिसरातील १० ते १२ रोहित्र गेल्या काही दिवसांपासून कंपनीने सोडविली असल्यामुळे माणसांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. यामुळे संतप्त नागरिकांनी पंढरपूर-सातारा रस्त्यावरील उपरी येथे रस्ता रोको आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
पंढरपूर : वीज वितरण कंपनीने पंढरपूर तालुक्यात थकीत असलेल्या शेतकºयांचा वीजपुरवठा खंडित करून रोहित्र सोडविण्याचे काम सुरू केले आहे. उपरी (ता. पंढरपूर) व परिसरातील १० ते १२ रोहित्र गेल्या काही दिवसांपासून कंपनीने सोडविली असल्यामुळे माणसांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. यामुळे संतप्त नागरिकांनी पंढरपूर-सातारा रस्त्यावरील उपरी येथे रस्ता रोको आंदोलन केले.
जोपर्यंत खंडित वीजपुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत रस्ता रोको सुरू राहणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिल्यामुळे पंढरपूर-सातारा रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दुष्काळातील वीज बिले माफ करावीत, थकीत वीज बिले भरण्यासाठी चार ते पाच महिन्यांची मुदतवाढ मिळावी, रखडलेल्या सिंगल फेज योजना सुरू करून गाव डीपीचा प्रश्न कायम स्वरूपी सोडवावा, आदी मागण्यांसाठी ग्रामस्थांनी रस्ता रोको केला.
यावेळी कंपनीच्या अधिकाºयांकडून केवळ वीजपुरवठा सुरू करण्याचे आश्वासन दिले जात होते, परंतु जोपर्यंत वीजपुरवठा सुरू होत नाही, तोपर्यंत ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन सुरू केले. त्यामुळे वरिष्ठांशी संपर्क साधून महावितरणच्या अधिकाºयांनी दोन दिवसात सर्व परिस्थिती सुरळीत करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.
यावेळी भंडीशेगावचे शाखा अभियंता सोनवणे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सहकार शिरोमणीचे संचालक विलास जगदाळे, माजी उपसरपंच शहाजी मोहिते, शहाजी जगदाळे, स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे तालुकाध्यक्ष नवनाथ माने, सेवा सोसायटीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब नागणे, उपसरपंच आण्णा नागणे, पै. साहेबराव नागणे, दत्तात्रय मा. नागणे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नवनाथ आसबे, माजी अध्यक्ष तुकाराम नागणे, साहेबराव नागणे, चंद्रकांत बागल उपस्थित होते.
-----------------
ऐन हिवाळ्यात पिके धोक्यात
-कंपनीच्या वतीने थकबाकीदारांचा विद्युत पुरवठा खंडित करून रोहित्र सोडविण्याचे काम सुरू असल्याने जनावरे व माणसांच्या पिण्याच्या पाण्याचे हाल होत आहेत. नवीन लागवडीची पिके ऐन हिवाळ्यात धोक्यात आली आहेत. कोणताही अधिकार नसताना कंपनीचे अधिकारी व कर्मचारी दंडेलशाही पद्धतीने रोहित्र सोडविण्याचे काम करत आहेत. त्यामुळे आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन केले.
---------------
आत्महत्येचे लोण आता पश्चिम महाराष्ट्रात आले आहे. शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे आमच्या जीवाशी खेळू नका, आमच्यावर दादागिरी करू नका, अन्यथा याचे परिणाम भोगावे लागतील.
- समाधान फाटे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना
----------------
कष्टाचा दाम द्या
-आम्ही नेमके कशा कशाकरिता रस्त्यावर उतरायचे हे कळेनासे झाले आहे. वीज बिलांबाबत लोकप्रतिनिधींना फोन लावला तर ते म्हणतात बिले भरा. ‘अच्छे दिन’ येतील म्हणून बदल केलेल्यांनीच सर्व पैसा काढून घेतला आहे. गोड बोले बाहुले गोड बोलून शेतकºयांसह सर्वांनाच वेठीस धरत आहेत. आम्हाला भीक नको, कष्टाचा दाम हवा आहे. आम्हाला लाईट द्या, दुष्काळाचे वीज बिल माफ करा अन्यथा आम्हाला ट्रकभर कासरे द्या, आम्ही हुतात्मे होण्यास तयार आहोत, असे शेतकरी दत्तात्रय नागणे यांनी सांगितले.