राष्ट्रवादीचे आमदार हनुमंत डोळस यांचं निधन, उद्या अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 01:42 PM2019-04-30T13:42:24+5:302019-04-30T13:42:48+5:30
माळशिरस तालुक्याचे आमदार हनुमंत डोळस यांना प्रकृती अत्यवस्थ्यामुळे मुंबईतल्या सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
मुंबई/सोलापूर - माळशिरस तालुक्याचे आमदार हनुमंत डोळस यांना प्रकृती अत्यवस्थ्यामुळे मुंबईतल्या सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर रुग्णालयात उपचारही सुरू होते. अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. गेल्या 2 वर्षांपासून ते कर्करोगाने ग्रस्त होते. उद्या सकाळी 10 वाजता दसूर तालुका माळशिरस येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून 2014 साली हनुमंत डोळस यांना उमेदवारी देण्यात आली होती.
माळशिरस हा मतदारसंघ राखीव असून त्या मतदारसंघातून ते राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजयी झाले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईच्या चर्नी रोड परिसरातील सैफी रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर त्यांनी आज सैफी रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या माळशिरस मतदारसंघातून आमदार डोळस हे 2009 आणि 2014 मध्ये आमदार झाले होते.
1999 ते 2005पर्यंत माजी खा. रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यासमवेत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या उभारणीत त्यांनी योगदान दिलं होतं. 13 ऑक्टोबर 2009मध्ये माळशिरस विधानसभा मतदारसंघातून प्रथमच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले. 16226 एवढ्या मताधिक्याने ते विजयी झाले होते, माळशिरस मतदारसंघाचं त्यांनी दोनदा प्रतिनिधित्व केलं. माळशिरसचे आमदार म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले.
हनुमंत डोळस हे मोहिते-पाटील घराण्याचे विश्वासू सहकारी होते. कॅन्सर या दुर्धर आजाराने ग्रासलेले हनुमंत डोळस गेल्या वर्षभरापासून मृत्यूशी झुंज देत होते. खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 1985पासून दरवर्षी मातोश्री कलावती डोळस चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांना शालेय वह्यांचे वाटप करायचे.