‘गुरुजनांचे सामूहिक विडंबन थांबवा’, राज्य शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 04:44 AM2017-09-19T04:44:48+5:302017-09-19T04:44:51+5:30
शिक्षक हा समाजाला दिशा देणारा घटक आहे़ परंतु अलीकडे शिक्षकांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल असे विडंबन सुरु आहे़ महिला शिक्षिकांनादेखील कमकुवत दाखवणारे संदेश फिरतात. गुरुजनांच्या प्रती होणारे हे सामूहिक विडंबन तातडीने थांबवा, असे आवाहन राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले़
सोलापूर : शिक्षक हा समाजाला दिशा देणारा घटक आहे़ परंतु अलीकडे शिक्षकांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल असे विडंबन सुरु आहे़ महिला शिक्षिकांनादेखील कमकुवत दाखवणारे संदेश फिरतात. गुरुजनांच्या प्रती होणारे हे सामूहिक विडंबन तातडीने थांबवा, असे आवाहन राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले़
राज्य शासनाचा राज्य शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा सोमवारी सकाळी सोलापूरमध्ये हुतात्मा स्मृती मंदिरात पार पडला़ याप्रसंगी ते बोलत होते. सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, आ़ भारत भालके, शिक्षण सचिव नंदकुमार, माध्यमिक शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे, प्राथमिक शिक्षण संचालक सुनील चव्हाण, आदी उपस्थित होते.
यावेळी ३७ प्राथमिक तसेच ३९ माध्यमिक तसेच आदिवासी भागातील १८, कला-क्रीडा क्षेत्रात काम करणारे दोन, स्काऊट गाईडचे दोन शिक्षक आणि अपंग आणि सावित्रीबाई आदर्श शिक्षिका पुरस्कारप्राप्त आठ शिक्षिकांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले़
प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांना खेळाप्रमाणे स्वच्छतेसाठी अर्धातास समाविष्ठ करावा, अशी अपेक्षा सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केली.
राज्यातील ६५ हजार पैकी ६० हजार शाळांना सर्वसामान्य जनता आणि कंपन्यांनी सीएसआरमधून एकूण ३२८ कोटींची मदत दिल्याची माहिती शिक्षण सचिव नंदकुमार यांनी प्रास्ताविकात दिली. शिक्षक परिचय पुस्तिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.