पोलीस अधीक्षकांचा इशारा; विनाकारण घराबाहेर पडाल तर गाडी जप्त करून गुन्हे दाखल करू
By appasaheb.patil | Published: April 30, 2021 12:44 PM2021-04-30T12:44:25+5:302021-04-30T12:53:37+5:30
पंढरपूर -मंगळवेढा पोटनिवडणूक मतमोजणीसाठी त्रिस्तरीय पोलीस बंदोबस्त
सोलापूर - पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी ग्रामीण पोलिसांनी त्रिस्तरीय पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहे. पासेस असणाऱ्यांनाच मतमोजणी कक्षात प्रवेश देण्यात येणार आहे. मतमोजणीच्या दिवशी अत्यावश्यक सेवावगळता कोणालाही पंढरपूर शहर व जिल्ह्यात फिरता येणार नाही, निकालादिवशी विनाकारण फिरल्याचे आढळून आल्यास गाडी जप्त करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला आहे.
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी १६ मार्चला निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १७ एप्रिलला मतदान पार पडले. आता रविवार २ मे रोजी पंढरपुरातील शासकीय धान्य गाेदाम, कराड रोड येथील गोदाम क्रमांक ४ क येथे होणार आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र असणाऱ्यांनाच मतमोजणी कक्षात प्रवेश मिळणार आहे शिवाय मतमोजणी कक्षात कोरोना प्रतिबंधात्मक सर्व नियमांचे पालन करण्यात येणार असल्याचेही ग्रामीण पोलिसांनी सांगितले. यंदाच्या वर्षी निकालाचे अपडेट देण्यासाठीचा लाऊड स्पीकर लावण्यात येणार नसल्याचेही पोलिसांनी सांगितले.
पोलीस देणार प्रतिनिधींना पासेस...
मतमोजणी केंद्रात प्रवेश देण्यासाठी संबंधित उमेदवारांकडून ठराविक प्रतिनिधीचे नाव, कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट मिळाल्यानंतर संबंधितांना ग्रामीण पोलिसांकडून पासेस देण्यात येणार आहे. ज्या प्रतिनिधींकडे पासेस असणार आहेत त्यांनाच मतमोजणी केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे शिवाय मतमोजणी केंद्रात कोरोनाचे नियम पाळण्यासंदर्भात सक्त सूचना देण्यात येणार असल्याचे ग्रामीण पोलिसांनी सांगितले.
असा असेल पोलिसांचा बंदोबस्त...
पंढरपूर शहर व मतमोजणी केंद्र परिसरात जमावबंदीचा आदेश लागू असणार आहे. त्रिस्तरीय पोलीस बंदोबस्तात राज्य राखीव पोलीस बल, लोहमार्ग पोलीस, सोलापूर, लातूर पोलीस प्रशिक्षण केंद्रातील पोलीस, होमगार्ड असा एकूण ५०० ते ७०० लाेकांचा बंदोबस्त लावण्यात येणार आहे शिवाय मुख्यालयात काही पोलिसांचा बंदोबस्त राखीव ठेवण्यात आला असून गरज पडल्यास त्यांचाही मदत घेण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितले.
घरबसल्या ऐका निवडणूक निकाल...
निवडणूक आयोगाने पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीच्या निकालाच्या प्रत्येक अपडेटची माहिती निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन मिळणार आहे शिवाय सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून घरबसल्या ऐकण्यास मिळणार आहे. त्यामुळे मतदारांनी घरी बसूनच निवडणूक निकाल ऐकावा अन् पहावा, असेही आवाहन ग्रामीण पोलिसांनी केले आहे.
निकालाच्या दिवशी पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यात पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. निकालानंतर विजयी मिरवणूक व जल्लोष करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. संचारबंदी, निवडणूक आयाेग, जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सर्व नियम व आदेशांचे पालन करावे. पालन न केल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.
- तेजस्वी सातपुते,
पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण.