पतीने सोडली साथ.. मात्र न डगमगता शिपायाची मुलगी बनली पीएसआय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 05:57 PM2023-07-07T17:57:25+5:302023-07-07T18:01:40+5:30
पहिल्याच प्रयत्नात यश : बापाने पंचायत समितीत वाटले पेढे
शिवानंद फुलारी
अक्कलकोट : लग्नानंतर पतीने साथ सोडली... मात्र, त्याच विचारात न बसता मोठ्या जिद्दीने पुण्यातील पाहुण्यांकडे राहून अभ्यास केला. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी वडिलांच्या कष्टाचे चीज करून दाखविण्यासाठी रुपाली या पहिल्याच प्रयत्नात पीएसआय बनल्या आहेत. पंचायत समितीत शिपाई म्हणून काम करणाऱ्या राजेंद्र जाधव यांची मुलगी फौजदार म्हणून साहेब बनली. त्या आनंदात बापाने पंचायत समितीत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. गटविकास अधिकारी सचिन खुडे यांनीही तीन किलो पेढे वाटून सन्मान केला.
करजगी (ता. अक्कलकोट) येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या राजेंद्र जाधव यांची मुलगी रुपाली राजेंद्र जाधव ही एका झटक्यात पोलिस उपनिरीक्षक( पीएसआय) परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे. राजेंद्र जाधव हे मूळचे होटगी (ता. दक्षिण सोलापूर) येथील रहिवासी आहेत. नोकरीच्या निमित्ताने ते अक्कलकोट तालुक्यात आहेत. रुपाली या महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी) परीक्षा २०२१ मध्ये दिली होती. त्याचा निकाल लागला असून, त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले आहे. त्या बी.कॉम.पर्यंत शिकल्या असून, पुणे येथे नातेवाइकांकडे राहून सेल्फस्टडी करून यश संपादन केले. मागील चार वर्षांपासून त्या पुण्यात राहत होत्या. भावजी संदीप गायकवाड हे पोलिस खात्यात कॉन्स्टेबल असून, त्यांच्या प्रोत्साहनामुळे रुपाली या फौजदार बनल्या आहेत.