पंढरीवर तिसरा डोळा मंदिर परिसर, विविध भागात बसविले १०० सीसीटीव्ही कॅमेरे
By admin | Published: June 30, 2017 12:42 PM2017-06-30T12:42:41+5:302017-06-30T12:42:41+5:30
आॅनलाइन लोकमत सोलापूर
आॅनलाइन लोकमत सोलापूर
पंढरपूर : प्रभू पुजारी
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व परिसर, श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप, पत्राशेडपर्यंतची दर्शन रांग, चंद्रभागा वाळवंट आदी ठिकाणांतील छोट्या-मोठ्या घटना, घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने एकूण १०० ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत़ यासाठी मंदिरात आणि संत तुकाराम भवन येथे असे दोन नियंत्रण कक्ष (कंट्रोल रुम) तयार करण्यात आले आहेत़ सीसीटीव्हीरुपी तिसऱ्या डोळ्याचा वॉच संपूर्ण पंढरीवर असेल़
आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूर शहरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे़ येणाऱ्या सर्व भाविकांना शिस्तीत दर्शन व्हावे, यासाठी मंदिर समितीने संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप आणि तेथून स्कायवॉक, दर्शन रांगेची सोय केली आहे़ शिवाय मंदिर समितीचे कायमस्वरुपी चार पत्राशेड असून, आता यात्रा कालावधीसाठी तात्पुरते १० पत्राशेड उभारण्यात आले आहेत़ या ठिकाणी दर्शन रांगेत होणारी घुसखोरी, भाविक भोवळ येऊन पडणे, धक्काबुक्की, चोरी अशा घटना, घडामोडींवर सीसीटीव्हीची नजर असेल़ दर्शन रांगेत कोठे असा प्रकार होत असल्याचे लक्षात येताच नियंत्रण कक्षातून वॉकीटॉकीद्वारे संवाद साधून यावर तत्काळ उपाययोजना करण्यासाठी सीसीटीव्हीची मदत होणार आहे़
मंदिर समितीने एकूण १०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असले तरी त्यातील ६५ हे कायमस्वरुपी आहेत तर ३५ तात्पुरत्या स्वरुपाचे आहेत़
------------------------------
फोकल लेंथचे कॅमेरे
विशेष म्हणजे कार्तिकी वारीच्या वेळीच चंद्रभागा वाळवंटातील घडामोडी टिपण्यासाठी महाद्वार घाटावरील हायमास्ट दिव्यावर कायमस्वरूपी ‘फोकल लेंथ’चे चार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत़ या कॅमेऱ्यांमुळे चंद्रभागा पात्रातील घटना, घडामोडींवर लक्ष ठेण्यास मदत होणार आहे़