स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सोलापूर जिल्ह्यात १ लाख ७ हजार शौचालयांचे काम पूर्ण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 11:43 AM2017-11-09T11:43:30+5:302017-11-09T11:49:54+5:30
स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत जिल्ह्यात यंदा १ लाख १२ हजार ५७१ शौचालयांचे बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. गेल्या पाच महिन्यांमध्ये १ लाख ७ हजार ४२३ शौचालयांचे काम पूर्ण झाल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिली.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ८ : स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत जिल्ह्यात यंदा १ लाख १२ हजार ५७१ शौचालयांचे बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. गेल्या पाच महिन्यांमध्ये १ लाख ७ हजार ४२३ शौचालयांचे काम पूर्ण झाल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिली. आणखी ५ हजार १४८ शौचालयांचे काम करणे बाकी असून १५ नोव्हेंबरपर्यंत काम पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
जिल्हा परिषदेच्या शिवरत्न सभागृहात बुधवारी सीईओ डॉ. भारुड यांनी गटविकास अधिकारी आणि विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर डॉ. भारुड म्हणाले की, निश्चित केलेल्या उद्दिष्टापैकी ५ हजार १४८ शौचालयांचे काम होणे बाकी आहे. यासाठी ग्रामसेवकापासून वरिष्ठ अधिकाºयांपर्यंत सर्वांनी परिश्रम घेतले आहेत.
सध्या माढा तालुक्यात २६२३, माळशिरस तालुक्यात ८४०, दक्षिण सोलापूर तालुक्यात ६१४, मोहोळ तालुक्यात १०७१ शौचालयांची कामे होणे बाकी आहे. माढा तालुक्यातील काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. अपंगसाठी १७०० शौचालये बांधण्यात आली आहेत.
-------------------------
जिल्हा राज्यात आघाडीवर
- शौचालयांचे काम पूर्ण झाल्यानंतर जीओ ट्रॅकिंग सिस्टीमच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर फोटोही अपलोड केले जात आहेत. गटविकास अधिकाºयांकडून कामांचा आढावाही घेतला जात आहे. शौचालय बांधणीच्या कामात जिल्हा राज्यात आघाडीवर असल्याचेही सीईओ डॉ. भारुड यांनी सांगितले.
----------------------
चार तालुक्यातील बीडीओंचा सत्कार
- आढावा बैठकीत मंगळवेढा, करमाळा व बार्शी, अक्कलकोट, सांगोला या तालुक्यांतील गटविकास अधिकाºयांनी शौचालयांची कामे पूर्ण झाल्याचे सांगितले. मंगळवेढ्याचे गटविकास अधिकारी आर. आर. जाधव, बार्शीचे गटविकास अधिकारी प्रमोद काळे, करमाळ्याचे गटविकास अधिकारी बाळासाहेब ढवळे-पाटील व अक्कलकोटचे गटविकास अधिकारी महादेव बेळ्ळे यांचा सत्कार मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी. व्ही. बनसोडे, प्रकल्प अधिकारी अनिलकुमार नव्हाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) चंचला पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय लोंढे आदी उपस्थित होते.