Video - जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2019 11:21 AM2019-07-07T11:21:18+5:302019-07-07T11:26:13+5:30
हरिनामाचा जयघोष आणि टाळ-मृदंगाचा गजर करत देहूहून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले.
अकलूज - हरिनामाचा जयघोष आणि टाळ-मृदंगाचा गजर करत देहूहून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले. सोलापूर व पुणे जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सराटी पुलावर पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी स्वागत केले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, माजी झेडपी अध्यक्ष मदनसिंह मोहिते-पाटील, सभापती वैष्णवीदेवी मोहिते-पाटील, उपसभापती किशोर सूळ, प्रांताधिकारी शमा पवार, तहसीलदार अभिजीत पाटील, गटविकास अधिकारी स्मिता पाटील उपस्थित होते.
संत तुकाराम महाराज पालखीच्या स्वागतासाठी सकाळी सात वाजल्यापासूनच वारकरी, भाविक, तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांची गर्दी होऊ लागली होती. निरा नदी ओलांडून सुमारे ८.३० च्या सुमारास तुकाराम महाराजांच्या पालखीचे आगमन झाले. पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी अश्वपूजन व पादुकांचे पूजन केले. त्यानंतर पालखी सोहळा अकलूजच्या दिशेने मार्गस्त झाला.
अकलूज शहरातर्फे माजी खा. विजयसिंह मोहिते-पाटील, माजी खा. रणजितसिंह मोहिते-पाटील, सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील, उपसरपंच धनंजय देशमुख, नंदिनीदेवी मोहिते-पाटील, सत्यप्रभादेवी मोहिते-पाटील, संकल्प डोळस यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी व अकलूजचे ग्रामस्थ उपस्थित होते. यावर्षी अकलूज येथे पालखी सोहळ्यासाठी प्रथम पोलीस बँडचे आयोजन केले होते. यानंतर पालखी सोहळा अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात दाखल झाला.