विठु-रखुमाईचे मनमोहक रुप, 'तिरंग्यात' दिसला 'राजा पंढरीचा'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 10:13 AM2019-01-26T10:13:40+5:302019-01-26T10:16:20+5:30
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने प्रत्येक हिंदू सणाला विविध फुलांची आरास करून मंदिराची सजावट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सोलापूर - 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आज श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात तिरंगा फुलांची आकर्षक आरास करण्यात आली आहे. यासाठी विविध प्रकारच्या फुलांचा वापर करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली. सावळ्या विठु-रुखुमाईचे हे रुप पाहून भक्तांना दर्शनाचा आनंद द्विगुणीत झाल्याशिवाय राहणार नाही.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने प्रत्येक हिंदू सणाला विविध फुलांची आरास करून मंदिराची सजावट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळेच प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय सण आहे, याचे औचित्य साधून 25 जानेवारी रोजी रात्रभर आरास करण्याचे काम पुणे येथील भारत भुजबळ यांच्यासह 20 कारागीरांनी केले. तिरंग्याने सजललेल्या या आरास कामासाठी झेंडुची फुले, तुळस, अष्टर यासह अन्य फुलांचा वापर केला आहे. या विविध फुलांमधून वेगवेगळा सुगंध दरवळत होता. शनिवारी प्रजासत्ताक दिन आणि रविवार असे दोन सलग सुट्टी आल्याने आजपासून मंदिरात भाविकांची गर्दी झाल्याचे दिसून येते. सध्या चंद्रभागा नदीपात्रात पाणी असल्याने पवित्र स्नान करण्यासाठी या ठिकाणीही भाविकांची गर्दी होत आहे. दरम्यान, विठु-रुखुमाईला पहिल्यांदाच तिरंग्याने सजवलेल्या फुलांच्या आरासमध्ये पाहून भक्तांनाही देशभक्ती आणि विठ्ठलाच्या भक्तीचा दुहेरी संगम अनुभवता आला आहे.