'वेटर ते आमदार'... बालवयातच अनाथ झालेल्या हनुमंत डोळसांचा थक्क करणारा जीवनप्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 03:44 PM2019-04-30T15:44:12+5:302019-04-30T16:28:22+5:30

हनुमंतराव डोळस यांचा जन्म 1 जून 1962 या माळशिरस तालुक्यातील दसूर या गावी झाला होता. गावकडच्या दूसर येथील जिल्हा परिषद शाळेतच त्यांनी पहिली ते चौथीपर्यंतचे आपले शिक्षण पूर्ण केले.

'Waiter to MLA' ... astonishing journey of MLA hanumant dolas inspiring story | 'वेटर ते आमदार'... बालवयातच अनाथ झालेल्या हनुमंत डोळसांचा थक्क करणारा जीवनप्रवास

'वेटर ते आमदार'... बालवयातच अनाथ झालेल्या हनुमंत डोळसांचा थक्क करणारा जीवनप्रवास

googlenewsNext

सोलापूर - माळशिरसचे आमदार हनुमंतराव डोळस यांनी मुंबईतील सैफी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. आपल्या 56 वर्षांच्या जीवनात डोळस यांनी अनेक चढउतार पाहिले. वयाच्या चौथ्या महिन्यात आईचे छत्र हरविल्यानंतर वयाच्या आठव्या वर्षी वडिलांचेही निधन झाले. त्यामुळे आठव्या वर्षीच पोरकं झालेल्या या पोराच भवितव्य अंधकारमय बनलं होतं. मात्र, मिळेल ते काम प्रामाणिकपणे करत जीवनाचा चढता आलेख माळशिरसच्या हनुमंताने गाठला.  

हनुमंतराव डोळस यांचा जन्म 1 जून 1962 या माळशिरस तालुक्यातील दसूर या गावी झाला होता. गावकडच्या दूसर येथील जिल्हा परिषद शाळेतच त्यांनी पहिली ते चौथीपर्यंतचे आपले शिक्षण पूर्ण केले. वयाच्या चौथ्या महिन्यातच आईचे निधन झाल्यानंतर, शालेय शिक्षण सुरू असतानाच्या काळात वडिलांचेही छत्र हरवले. त्यामुळे बालवयातच हनुमंता पोरका झाला. तरीही, नातेवाईकांच्या मतदीने हनुमंताने आपले शिक्षण पूर्ण केले. बोंडले येथे इयत्ता पाचवी ते सातवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पंढरपूर तालुक्यातील विवेक वर्धनी येथे आठवी ते अकरावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी मुंबई गाठली. मुंबईत शिक्षणासाठी आल्यानंतर बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे हनुमंत यांना हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करावे लागले होते. वेटर म्हणून काम करत असतानाच हनुमंत यांनी आपले बी कॉमपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. 

सन ऐंशीच्या दशकातील सुरुवातीच्या काळात माळशिरसचे नेते विजयसिंह मोहिते पाटील 1980 मध्ये आमदार होते. त्यावेळी हनुमंत यांची त्यांच्याशी जवळीक वाढली. त्यातूनच, हनुमंत यांचा जीवनप्रवास आणि कामाची धडपड पाहून विजयसिंह मोहिते पाटील यांनी हनुमंत यांना 1982 मध्ये युवक काँग्रेस बोरोवली शाखेचे अध्यक्ष केले. त्यानंतर, पक्षसंघटनेसाठी केलेल्या कामाची दखल घेऊन 1985 मध्ये मुंबई शहर युवक काँग्रेस कार्यकारणीवर त्यांची निवड करण्यात आली. त्यामुळे आ. विजयसिंह मोहिते पाटील यांच्या कामाचा विस्तार राज्यभर पसरविण्यासाठी राज्यस्तरीय कब्बडी स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यातूनच, हनुमंत यांच्यावर मोहिते पाटील यांचा विश्वास अधिक दृढ झाला. त्यामुळे सन 1990 मध्ये म्हाडाच्या सदस्यपदी त्यांची निवड करण्यात आली. 

सन 1997 मध्ये युवक काँग्रेसच्या राज्य कार्यकारणीवरही त्यांची निवड झाली होती. त्याच दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी 1999 मध्ये राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली. त्यावेळी, आमदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह हनुमंत डोळस यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे, 24 जुन 199 रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस म्हणून त्यांची निवड करण्यात आली. तर डिसेंबर 1999 मध्ये महाराष्ट्र राज्य चर्मोद्योग महामंडळाच्या अध्यक्षपदी  त्यांची वर्णी लागली. शरद पवार आणि मोहिते पाटील यांचे विश्वासू म्हणूनही या काळात त्यांनी नावलौकिक मिळवला. त्याची पोचपावती म्हणून 2009 आणि 2014 मध्ये माळशिरस मतदारसंघातून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विधानसभेची उमेदवारी देण्यात आली.

माळशिरस हा मतदारसंघ राखीव असल्याने राखीव मतदार संघातून ते 2 वेळा आमदार बनून विधानसभेत पोहोचले. आल्या परिस्थीतीशी दोन हात करत एकेकाळी मुंबईतील हॉटेलमध्ये वेटरचे काम करणारा हनुमंता महाराष्ट्राच्या विधानभवनात आमदार बनून सन्मानाने पोहोचला होता. मात्र, नियतीच्या मनात वेगळंच होत. त्यामुळे कर्करोगाने ग्रासल्यानंतर कायम माणसात दिसणारे हनुमंतराव रुग्णालयात दाखल झाले. गेल्या 2 वर्षांपासून मृत्युशी सुरू असलेली हनुमंत डोळस यांची झुंज मंगळवारी दुपारी अपयशी ठरली. आपल्या कारकिर्दीत बहुजन आणि मागास समाजातील लोकांना उभारण्याचं काम या नेत्यानं केलं होतं. या नेत्याचा थक्क करणारा जीवनप्रवास येणाऱ्या कित्येक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल हे नक्की.

Web Title: 'Waiter to MLA' ... astonishing journey of MLA hanumant dolas inspiring story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.