धनगर, मुस्लीम आरक्षणाचे काय झाले; सुशीलकुमार शिंदेंचा भाजपाला सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 03:27 PM2019-03-27T15:27:29+5:302019-03-27T15:30:39+5:30
भाजपाला गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता दिलीत, तुम्हाला काय मिळाले ? असा सवाल करताना शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली.
सोलापूर : गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता दिली तरी सोलापूरकरांना पाच दिवसाआड पाणी मिळते. भाजपाचा हाच विकास का, असा सवाल सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मंगळवारी येथे बोलताना उपस्थित केला.
काँग्रेस आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सलगरवस्ती येथे आयोजित महिला मेळाव्यात शिंदे बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते मनोहर सपाटे, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या उज्ज्वलाताई शिंदे, शहर अध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश वाले, गटनेते चेतन नरोटे, माजी महापौर संजय हेमगड्डी, अलका राठोड आदी उपस्थित होते. प्रारंभी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर अध्यक्षा सुनीता रोटे यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी बोलताना शिंदे यांनी धनगर, मुस्लीम आरक्षण मिळाले का, असा सवाल केला. भाजपाला गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता दिलीत, तुम्हाला काय मिळाले? पाच दिवसाआड पाणी येते, हाच विकास आहे का? असा सवाल करताना शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. रात्रीत नोटाबंदी करून सर्वसामान्यांना रांगेत उभे केले. यामुळे अनेकांचा बळी गेला. शेतीमालाला भाव न मिळाल्याने शेतकºयांच्या आत्महत्या वाढल्या. कर्जमाफी नावाला दिली. शेतकºयांना फायदा झालाच नाही. बेकारीमुळे तरूणवर्ग हवालदिल आहे. खात्यावर १५ लाख जमा करतो म्हणणाºयांनी सामान्यांना काय दिले? रेशनचे धान्य बंद केले. दुष्काळ पडला तरी हाताला काम दिले जात नाही.