गणपती विसर्जन करताना विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2018 10:34 AM2018-09-23T10:34:51+5:302018-09-23T10:39:58+5:30
सोलापूर तालुक्यातील नान्नज येथील गणपतीचे विसर्जन करताना तोल जाऊन पडल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
सोलापूर : सोलापूर तालुक्यातील नान्नज येथील गणपतीचे विसर्जन करताना तोल जाऊन पडल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. समाधान हनुमंत गवळी (30) या तरुणाचं नाव असून वैभव पाटील यांच्या शेतातील विहिरीमध्ये त्याचा मृत्यू झाला. शनिवारी (22 सप्टेंबर) रात्री ही घटना घडली.
नान्नज येथील वैभव पाटील यांच्या शेतामध्ये गेल्या दोन दिवसांपासून गणेश मूर्तीचे विसर्जन सुरू आहे. समाधान गवळी येणाऱ्या विसर्जन मिरवणुकांच्या मूर्तीचे विसर्जन करीत होता. पावणे नऊ वाजता शिवनेरी तरुण मंडळाचा गणपती विसर्जनासाठी आला होता. या गणपतीचं विसर्जन करण्यासाठी समाधान गवळी मूर्ती घेऊन खाली उतरत असताना अचानक तोल जाऊन तो पाण्यात पडला. पाण्यात पडल्यानंतर तो लवकर वर आला नाही त्यामुळे जवळ असलेल्या इतर कार्यकर्त्यांनी पाण्यामध्ये उड्या मारल्या आणि समाधान गवळी याला बाहेर काढले. समाधान गवळी यांच्या डोक्याला मार लागला होता. त्याला उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र समाधान गवळी याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. याप्रकरणी सिव्हिल पोलिस चौकीत मृत्यूची नोंद झाली आहे.