राज्यात संस्कृत अकादमी स्थापणार
By admin | Published: January 3, 2016 02:52 AM2016-01-03T02:52:22+5:302016-01-03T02:52:22+5:30
संस्कृत ही ज्ञानभाषा आहे. या भाषेत जगाला मार्ग दाखविण्याची क्षमता आणि शक्ती असल्याने महाराष्ट्रातही या भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा, यासाठी लवकरच संस्कृत अकादमी स्थापन करण्यात
नागपूर : संस्कृत ही ज्ञानभाषा आहे. या भाषेत जगाला मार्ग दाखविण्याची क्षमता आणि शक्ती असल्याने महाराष्ट्रातही या भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा, यासाठी लवकरच संस्कृत अकादमी स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केली.
रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मारक भवनात आयोजित संस्कृत भारती विदर्भ प्रांत कार्यकर्ता संमेलनात ते बोलत होते. त्यांच्या हस्ते जयराम व्यंकटेश पल्लेवार यांनी लिहिलेल्या ‘भारतरत्नमंजरी’ या संस्कृत काव्यपुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. व्यासपीठावर कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरू उमा वैद्य, संस्कृत भारतीचे अखिल भारतीय संघटनमंत्री दिनेश कामत, प्रचार व प्रसार प्रमुख श्री.श. देवपुजारी व अन्य मान्यवर उपस्थित होते. राज्यातील सर्व विभागांत संस्कृत भाषेचे बीएड महाविद्यालय सुरू करण्यात येईल. यासोबतच शालेय शिक्षणात संस्कृत भाषेचा समावेश कसा करता येईल, यासाठी शिक्षणमंत्र्यांसोबत चर्चा करून धोरण निश्चित करण्यात येईल. कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठाच्या विस्तारासाठी तसेच आर्थिक पाठबळ देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
इंग्रज राजवटीत संस्कृत भाषेच्या ज्ञानापासून वंचित ठेवण्याचे जाणीवपूर्वक शिक्षण पद्धतीत बदल करून संस्कृत भाषेला दूर ठेवण्यात आले, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, इंग्रज येण्यापूर्वी भारतात संस्कृत भाषेच्या प्रचारासाठी १२,५०० विद्यालये तर ७४२ महाविद्यालये होती.