भूखंड नियमानुसारच मिळाला : हेमा मालिनी
By admin | Published: February 2, 2016 03:46 AM2016-02-02T03:46:16+5:302016-02-02T03:46:16+5:30
‘शासकीय नियमांनुसारच माझ्या नृत्य संस्थेला शासनाचा भूखंड मिळालेला आहे. मी तो बळकावलेला असल्याचे जे चित्र निर्माण केले जात आहे ते योग्य नाही,’ असा खुलासा
मुंबई : ‘शासकीय नियमांनुसारच माझ्या नृत्य संस्थेला शासनाचा भूखंड मिळालेला आहे. मी तो बळकावलेला असल्याचे जे चित्र निर्माण केले जात आहे ते योग्य नाही,’ असा खुलासा अभिनेत्री आणि भाजपाच्या खासदार हेमा मालिनी यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
आंबिवली, अंधेरी येथे हेमा मालिनी यांच्या नाट्यविहार कलाकेंद्राला २ हजार चौरस मीटरचा भूखंड अलीकडेच राज्याच्या महसूल विभागाने दिला. कोट्यवधी रुपये किमतीचा हा भूखंड लीजवर केवळ ७० हजार रुपयांत दिला असल्याची बाब माहितीच्या अधिकारात समोर आली होती. यावर खुलासा करताना हेमा मालिनी म्हणाल्या की, ‘मी अजून या भूखंडासाठी एकही पैसा शासनाला दिलेला नाही. त्याची किंमत सरकार किती आकारणार आहे याची मला माहिती नाही. शासन म्हणेल तेवढी रक्कम मी भरेन.’
‘या विषयाचे राजकारण केले जाऊ नये, एवढीच माझी विनंती आहे. मला भूखंड मिळाल्याचा मुद्दा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय केल्याबद्दल मी आभारी आहे, पण नृत्य हे माझे
जीवन आहे आणि नृत्याच्या प्रोत्साहनासाठी संस्था उभारणे हा माझा अधिकार आहे. शासनाने त्यासाठी जमीन द्यावी, याकरिता मी २० वर्षे संघर्ष केला,’ असा दावाही त्यांनी केला. (विशेष प्रतिनिधी)