३७ हजार कोटींचे मुंबई महापालिका बजेट सादर
By admin | Published: February 3, 2016 04:24 PM2016-02-03T16:24:47+5:302016-02-03T18:14:25+5:30
मुंबई महापालिकेचा २०१६-१७ या आर्थिक वर्षाचा ३७ हजार ०५२ कोटींचा अर्थसंकल्प बुधवारी दुपारी स्थायी समितीसमोर सादर करण्यात आला.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३ - मुंबई महापालिकेचा २०१६-१७ या आर्थिक वर्षाचा ३७ हजार ५२ कोटींचा अर्थसंकल्प बुधवारी दुपारी स्थायी समितीसमोर सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात नरिमन पॉईंट ते कांदिवलीपर्यंतच्या कोस्टल रोडसाठी ( सागरी महामार्ग) १ हजार कोटींची तरतूद करण्यात आली असून रस्त्यांसाठी एकूण २८०६.८० कोटींची तरतूद केली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेला प्राधान्य देत महापालिकेने त्यासाठी १० कोटींची तरतूद केली आहे.
दरम्यान आरोग्य व वैद्यकीय विभागासाठी ३ हजार ६९३ कोटी रुपये तर शिक्षण विभागासाठी एकूण २ हजार ३९४ कोटींची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे, मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा शैक्षणिक क्षेत्रासाठी १०७ कोटी कमी देण्यात आले आहेत. नवीन मिनी सायन्स सेंटरसाठी ३.५ कोटी, शाळांमधील स्वच्छतागृहांसाठी १० कोटींची तरतूद आहे.
मुंबईत पेट्रोल- डिझेल होणार महाग
येत्या काळात मुंबईतील पेट्रोल व डिझेलच्या दरांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. आज मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पात कच्च्या तेलावरील जकात कर ३ टक्क्यांवरून वाढवून साडेचार टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आजच्या अर्थसंकल्पात मांडण्यात आला. त्यामुळे नजीकच्या काळात मुंबईत पेट्रोल-डिझेल महागण्याची शक्यता आहे.
अर्थसंकल्पातील महत्वाच्या तरतुदी :
- कोस्टल रोडसाठी १ हजार कोटींची तरतूद
- शहरातील रस्त्यांसाठी २८०६.८० कोटी
- एलईडी दिव्यांसाठी १० कोटी रुपये
- स्मार्ट सिटीसाठी १० कोटी
- राजावाडी व डॉ. आंबेडकर रुग्णालयात बालकांसाठी मिल्क बँकची योजना.
- सायन व नायर रुग्णालयात सुरू होणार बर्थ डिफेक्ट कंट्रोल क्लिनिक.
- देवनार पशुगृहासाठी १३७.९५ कोटी रुपयांची तरतूद
- गलिच्छ वस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी ६१० कोटींची तरतूद
- कचऱ्याबद्दलच्या जनजागृतीसाठी १५ कोटी
- पर्जन्य जलवाहन्यांसाठी १४०८.४८ कोटी
- ३७ शाळांच्या दुरुस्तीसाठी २२७.२४ कोटी, कॉम्प्युटर लॅब निर्मितीसाठी १७ कोटी ६८ लाख रुपयांची तरतूद
- व्हर्च्युअल क्लासरुमसाठी १५ कोटी ८८ लाख
- पालिका शाळांमधील प्रसाधनगृहे हायजेनिक करणार.