डेव्हिड हेडलीचे ‘कबुलीबॉम्ब’!

By admin | Published: February 9, 2016 04:12 AM2016-02-09T04:12:47+5:302016-02-09T04:12:47+5:30

मुंबईत रेकी करण्यासाठी नवा पासपोर्ट बनवला आणि त्याद्वारे मी सातवेळा पाकिस्तानातून मुंबईत दाखल झालो. शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण दिल्यानंतर काही महिन्यांत साजीद मीरने हाफीज सईद

David Headley's 'confession'! | डेव्हिड हेडलीचे ‘कबुलीबॉम्ब’!

डेव्हिड हेडलीचे ‘कबुलीबॉम्ब’!

Next

मुंबई : मुंबईत रेकी करण्यासाठी नवा पासपोर्ट बनवला आणि त्याद्वारे मी सातवेळा पाकिस्तानातून मुंबईत दाखल झालो. शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण दिल्यानंतर काही महिन्यांत साजीद मीरने हाफीज सईद आणि झकीर-उर-रहमान लखवी यांच्यामार्फत मला नव्या नावाने नवा पासपोर्ट काढण्यास सांगितले. एईटीचा कट्टर अनुयायी असल्याने हे काम मला का सांगण्यात आले, याची साधी विचारणाही मी मीरकडे केली नाही, अशी धक्कादायक कबुली मुंबईवरील २६/११च्या हल्ल्यातील माफीचा साक्षीदार बनलेल्या अमेरिकन नागरिक डेव्हिड हेडलीने सोमवारी दिली. हेडलीला २६/११ हल्ल्याप्रकरणी अमेरिकेने १२ आरोपांतर्गत दोषी ठरवून ३५ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तेथील तुरुंगातून त्याची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सोमवारी साक्ष झाली. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांवर त्याने उत्तरे दिली.

मी जन्माने अमेरिकेचा नागरिक, पण शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पाकिस्तानमध्ये झाले. प्राथमिक शिक्षण कराचीतील जीझस अ‍ॅण्ड मेरी कॉन्वेंट शाळेत, तर त्यापुढील शिक्षण अब्दाल हसन कॅडेट कॉलेजमध्ये झाले. ही आर्मीची शाळा आहे. (ही शाळा पाकिस्तानच्या अब्दाल हसन शहरात आहे आणि अब्दाल हसन हे शहर आहे, हे सांगताना हेडली अस्खलित हिंदी बोलला.)
वयाची १८ वर्षे पूर्ण केल्यावर मी पुन्हा अमेरिकेत आलो आणि तिथे आईला भेटलो. मला इंग्रजी, उर्दू आणि हिंदी या तीन भाषा माहीत आहेत. माझ्या वडिलांचे नाव सय्यद गिलानी आहे. पाकिस्तानमध्ये असतानाच मी नाव बदलण्याचा निर्णय घेतला. फिलाडेल्फिया येथून ५ फेब्रुवारी २००६ रोजी मी माझे नाव बदलण्यासाठी अर्ज केला. १५ फेब्रुवारी २००६ रोजी दाऊद सलीम गिलानी हे नाव बदलून मी डेव्हिड कोलमन हेडली, असे नामकरण करून घेतले. मला या नावाने पासपोर्ट हवा होता. भारतामध्ये प्रवेश मिळावा यासाठी आणि माझी खरी ओळख लपविण्यासाठी मी नाव बदलले. मला २००६मध्ये नवा पासपोर्ट मिळाल्यानंतर मी सगळ्यात आधी पाकिस्तानला गेलो. तिथे मी माझा सहकारी साजीद मीरला भेटलो. त्याला नव्या पासपोर्टची कल्पना दिल्यावर तो आनंदित झाला.
मी तेव्हा लष्कर-ए-तोयबाशी संबंधित असलेल्या बऱ्याच लोकांना भेटलो, पण त्यांची नावे आठवत नाहीत. साजीद मीर आमचा ‘मेन कॉन्टॅक्ट’ होता. काम पूर्ण झाल्याची माहिती मी त्याला सर्वांत आधी दिली.
भारतात येऊन काहीतरी व्यवसाय सुरू करण्याचे काम मला देण्यात आले होते. त्यासाठी नवा पासपोर्ट आणि नवे नाव लावण्याची सूचनाही मीरने केली होती. मला भारतात स्थिर करण्यासाठी या ठिकाणी व्यवसाय सुरू करण्याची कल्पना मीरची होती. त्याने त्या वेळी मला भारतात येऊन नेमके काय करायचे आहे, याची माहिती दिली नव्हती. केवळ मुंबईचे व्हिडीओ शूट करायचे, एवढीच सूचना त्याने केली होती. ते का करायचे, याची साधी विचारणाही मी मीरकडे केली नाही. मी एलईटीचा कट्टर अनुयायी असल्याने मला कामाची साधारणपणे कल्पना होती. नवीन पासपोर्ट मिळाल्यावर २६/११ हल्ल्यापूर्वी मी भारतात आठ वेळा आलो. त्यापैकी सात वेळा पाकिस्तानहून मुंबईत आलो तर एकदा यूएईवरून दिल्लीत आलो. हल्ल्यानंतर ७ मार्च २००९ रोजी पुन्हा एकदा मुंबईला भेट दिली. मी व्हिसा आणि पासपोर्टसाठी दिलेल्या माहितीतील माझी जन्मतारीख, आईचे नाव, जन्माचे ठिकाण आणि नागरिकत्व याशिवाय मी फॉर्ममध्ये कोणतीच माहिती खरी भरली नव्हती. वडिलांचे नावही खोटे भरले होते. हा फॉर्म शिकागो येथील कौन्सिल जनरल आॅफ इंडियाला दिला होता. माझी ओळख लपविण्यासाठी मी खोटी माहिती दिली होती.
मला व्हिसा मिळावा, यासाठी मेसर्स इंमिग्रंट लॉ सेंटरचे भागीदार जे. सॅण्डरर्स यांनी माझी शिफारस केली. जे. सॅण्डरर्स यांच्याबरोबर डॉ. तहव्वूर राणा याने चर्चा केली. डॉ. राणा याला मी शाळेपासून ओळखत होतो. आम्ही एकाच शाळेत होतो. मी व्हिसा कशासाठी मागत आहे याची कल्पना त्याला नव्हती. मात्र मुंबईवरील हल्ल्यापूर्वी त्याला याबाबत समजले होते. पाकिस्तानच्या मेजर अली याने आयएसआयच्या मेजर इक्बालशी ओळख करून दिली. अफगाणच्या सीमारेषेत प्रवेश केल्याबद्दल लंदीकोटल येथे मला अटक करण्यात आली. माझ्या हातात भारतीय साहित्य असल्याने त्यांना मी परदेशी भारतीय वाटलो. त्यामुळे त्यांनी मला अटक केली. माझी ओळख सांगितल्यानंतर मेजर अली यांनी माझी सुटका केली. त्यानंतर त्यांनी माझी ओळख मेजर इक्बाल याच्याशी करून दिली. भविष्यात इंटेलिजन्सच्या कामासाठी उपयोगी येईल, असे मेजर अली याने मेजर इक्बालला सांगितले. लंदीकोटला माझ्याबरोबर अब्दुल रहमान पाशा होते. आम्ही झैद शहा नावाच्या ड्रग पेडलरला भेटण्यासाठी जात होतो. भारतामध्ये शस्त्रे पोहोचविण्यास झैद मदत करू शकतो का, हे आम्हाला समजून घ्यायचे होते.

कोण हा हेडली?
डेव्हिड हेडलीचे मूळ नाव दाऊद सय्यद गिलानी. ३० जून १९६० रोजी वॉशिंग्टन येथे त्याचा जन्म झाला. वडील सय्यद पाकिस्तानी, तर आई सेरील अमेरिकन. १९७०मध्ये आई-वडील विभक्त झाले. त्यानंतर आई सेरील फिलाडेल्फियाला परतली. तेथे तिने खैबर पास या नावाने एक बार सुरू केला. दाऊद (डेव्हिड) मात्र पाकिस्तानात वडिलांसोबतच राहायचा. पाकिस्तानात मिलिटरी शाळेत शिकणारा डेव्हिड १९७७मध्ये अमेरिकेत आईकडे राहायला गेला. तिथे त्याला अमलीपदार्थांचे व्यसन जडले. व्यसनाच्या आहारी गेल्याने तो अमलीपदार्थांची तस्करी करू लागला. हेरॉईनची आयात करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून त्याला १९८९मध्ये अमेरिकेत अटक करण्यात आली होती. त्याने १९९४मध्ये न्यू यॉर्क गाठून तिथे व्हिडीओचे दुकान थाटले. अमलीपदार्थ प्रतिबंध आरोपाखाली त्याला पुन्हा अटक झाली. तथापि, त्याने शिक्षा कमी करण्यासाठी अमलीपदार्थविरोधी विभागासोबत काम करण्याचे मान्य केले. न्यू यॉर्कमधील पाकिस्तानी समुदायात शिरकाव करण्यासाठी त्याने या विभागातील अधिकाऱ्यांना मदत केली. पुढे २००२-०३मध्ये त्याने लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणाऱ्या पाकिस्तानी केंद्राला भेटी दिल्या आणि तो दहशतवादी कारवायांचे कट रचण्यात सहभागी झाला...

भारतीय सैन्याशी लढायचे होते!
माझी भारतीय सैन्याशी थेट लढण्याची इच्छा होती. मात्र झकीर-उर-रहेमानने माझे वय वाढले असल्याने ते काम माझ्यासाठी योग्य नसल्याचे सांगितले. योग्य वेळ आल्यावर अन्य एखादे काम सांगण्यात येईल, असे झकीरने सांगितले.
त्यानंतर झकीर-
उर-रहमान लखवी आणि हाफीज सईद यांनीच मुंबईमध्ये पाठवण्याची सूचना मीरद्वारे मला केली असावी. अबू फुरखान, सनाउल्ला, अबू हंजाल, अबू उस्मान, अबू सईद, अबू फआदउल्ला हे माझे प्रशिक्षक होते.
बहुतेकांना जेमतेम लिहितावाचता यायचे. मात्र
त्यांना एके-४७ व अन्य अत्याधुनिक शस्त्रे चालवता येतात. त्यांची खरी नावे त्यांनी मला कधीच सांगितली नाहीत. त्यांना याच नावाने सगळे ओळखायचे.

मी
अनेक
ई-मेल आयडी वापरले
मी तीन विवाह
केले. साजिया गिलानी,
पोशा पीटर आणि फैजा अवटाला अशी त्या तिघींची नावे आहेत. यापैकी फैजा अवटाला फैजाना ख्रिस्तियाना या नावाने ओळखली जाते.
2002
मध्ये एलईटीमध्ये मी भरती झालो. एलईटीचा मुख्य हाफीज सईद याच्या भाषणाने भारावून जाऊन मी
हा निर्णय घेतला. एलईटी ही अतिरेकी संघटना आहे.
या संघटनेचा मूळ उद्देश भारताच्या लष्कराशी लढणे आणि काश्मिरींना मदत करणे, हा आहे. भारतामध्ये झालेल्या सर्व दहशतवादी कारवायांमागे एलईटीचा हात आहे.

५ ते ६ कोर्सचे दहशतवादी प्रशिक्षण
एलईटीमध्ये सहभागी झाल्यानंतर पाच ते सहा कोर्सेस दोन वर्षांत पूर्ण करावे लागतात. दौरा-ए-सुफा, दौरा-ए-आम, दौरा-ए-खास आणि दौरा-ए-रिबक असे चार टप्प्यात कोर्स आहेत.
त्यात दौरा-ए-खासमध्ये अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण दिले जाते; तर दौरा-ए-रिबकमध्ये रेकी आणि ‘सेफ हाउस’चे प्रशिक्षण दिले जाते. शत्रूंच्या देशात स्थिरस्थावर होणे म्हणजे ‘सेफ हाउस’.
मुझफ्फराबाद, मुरीदगे, मनसेरा, आबोटाबाद
या सर्व एलईटीच्या सुरक्षित जागा आहेत. हाफीज सईद आणि झकीर-उर-रहमान लखवी भारताला शत्रू मानतात.

हल्ल्यापूर्वी सात वेळा मुंबईत आलो होतो...
हेडलीची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष सुरू असताना न्यायालयात ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ महेश जेठमलानी आणि काही अमेरिकन अधिकारीही उपस्थित होते. माफीचा साक्षीदार असलेल्या हेडली याला साक्षीत मदत करण्यासाठी अ‍ॅड. जेठमलानी हजर होते. त्यांनी नंतर पत्रकारांना सांगितले की, हेडलीला एनआयएतर्फे आज ५0 प्रश्न विचारण्यात आले आणि त्याची उत्तरे देताना आपण २६/११च्या हल्ल्यापूर्वी सात वेळा मुंबईला आलो होतो, हे मान्य केले आहे.

एनआयएला
हेडलीने २०१०मध्ये काय सांगितले?
प्रत्येक कारवाई लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक हाफीज सईदच्या हुकुमानुसारच व्हायची.
मुंबईत महत्त्वाच्या ठिकाणांची पाहणी करण्यासाठी मेजर इक्बालने मला पैसे दिले.
मार्च २००८मध्ये नेपाळ आणि बांगलादेशातून अतिरेकी पाठवून फक्त ताज हॉटेलवरच हल्ला करायचा, असा लष्कर-ए-तोयबाचा मूळ डाव होता.
हेडलीने साजीद मजीद, अब्दुल अल कामा आणि अबू क्वाहफा यांना संभाषणातील आवाजावरून ओळखले.
उपराष्ट्रपतीचे निवासस्थान, इंडिया गेट, पहाडगंज (नवी दिल्ली स्टेशन), सीबीआय आॅफिस आणि मुंबईतील इस्रायल एअरलाइन्सचे कार्यालय हल्ल्यासाठी हेरून त्याने त्या ठिकाणचे व्हिडीओचित्रण केले होते.
तुरुंगात लिहिलेल्या पुस्तकात त्याने आपण कसे लष्कर-ए-तोयबाकडे वळलो, यासंबंधीच्या आठवणी लिहिल्या आहेत. भारतापासून काश्मीरला स्वतंत्र करण्याच्या समर्पित ध्येयामुळे या संघटनेकडे वळलो.
घुसखोरी, बचाव, दडी मारणे, छुपा हल्ला करणे आणि शस्त्रसाठा शोधण्याचे तसेच रात्रसंचार, एके रायफल, पिस्तूल, आरपीजी ग्रेनेडने लक्ष्यभेद करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’ आणि आसपासच्या भागाची कशी टेहळणी केली, हेही त्याने आणि लेखक एस. हुसैनने या पुस्तकात लिहिले आहे.
त्याने ‘मातोश्री’चे १५ मिनिटे व्हिडीओचित्रण केले. ‘मातोश्री’त प्रवेश करता यावा, हेडलीने राहुल भट्टशी कशी मैत्री केली, हेही या पुस्तकात झैदी यांनी नमूद केले आहे.

डेव्हिड हेडलीच्या साक्षीबाबत विचारता ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले की, या साक्षीमुळे २६/११च्या हल्ल्यातील आतापर्यंत बाहेर न आलेली माहितीही समोर येईल. या हल्ल्यात आपला सहभाग नसल्याचे पाकिस्तानतर्फे जे सांगण्यात येत होते, ते खरे नसल्याचेही उघड होणार आहे.

हेडलीने आज जी उत्तरे दिली, त्याबाबत समाधानी आहोत. आपल्या साक्षीमध्ये त्याने अनेक सनसनाटी वक्तव्ये केली आहेत. त्याने हाफिज सईदला भेटल्याचे मान्य तर केलेच, पण चित्रामध्येही त्याने सईदला ओळखले. उद्या त्याच्या साक्षीतून आणखी बरीच माहिती हाती लागणार आहे. - उज्ज्वल निकम, विशेष सरकारी वकील

केंद्र सरकारने मुंबईतील २६/११च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार डेव्हिड हेडली याचा कबुलीजबाब आंतरराष्ट्रीय समुदायासमक्ष सादर करून त्याचा पाकिस्तानला घेरण्यासाठी वापर करावा. हेडलीने केलेले खुलासे केवळ पाकिस्तानपुढेच नव्हे, तर समस्त जगासमोर ठेवण्यात आले पाहिजे. - काँग्रेस

पाक-अमेरिकन दहशतवादी हेडली याने दिलेल्या साक्षीमुळे मुंबईतील दहशतवादी हल्ल्यामध्ये पाकिस्तानी सरकार आणि सरकारेतर तत्त्वांच्या भूमिकेवरील संदिग्धता दूर होईल आणि हे प्रकरण आपल्या तार्किक निष्कर्षाप्रत पोहोचेल. - किरेन रिजिजू,
केंद्रीय गृहराज्य मंत्री

Web Title: David Headley's 'confession'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.