तिसऱ्या प्रयत्नात मुंबई हादरवली!

By admin | Published: February 9, 2016 04:22 AM2016-02-09T04:22:53+5:302016-02-09T04:22:53+5:30

मुंबईतील ‘२६/११’वरील हल्ल्यापूर्वीही लष्कर-ए-तोयबाने (एलईटी) सप्टेंबर व आॅक्टोबर २००८मध्ये दोनदा हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. एलईटचा म्होरक्या हाफीज सईद व झकीर-उर-रहमान

Mumbai striking in the third attempt! | तिसऱ्या प्रयत्नात मुंबई हादरवली!

तिसऱ्या प्रयत्नात मुंबई हादरवली!

Next

डेव्हिड हेडलीची कबुली : तेच दहशतवादी दोनवेळा परत गेले; पाकमध्ये कट रचल्याची माहिती; आयएसआयचा सक्रिय सहभाग

मुंबई : मुंबईतील ‘२६/११’वरील हल्ल्यापूर्वीही लष्कर-ए-तोयबाने (एलईटी) सप्टेंबर व आॅक्टोबर २००८मध्ये दोनदा हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. एलईटचा म्होरक्या हाफीज सईद व झकीर-उर-रहमान लखवी यांच्या सूचनेनुसार पाकिस्तानात रचण्यात आलेला हा कट दोनदा अयशस्वी ठरला होता, अशी धक्कादायक माहिती या हल्ल्यातील माफीचा साक्षीदार बनलेला अमेरिकन नागरिक डेव्हिड हेडलीने सोमवारी दिली.
त्याच्या साक्षीमुळे मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात आणि एकूणच भारतातील अतिरेकी कारवायांत पाकिस्तानचाच हात असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. अमेरिकेतील तुरुंगात असलेल्या हेडलीची मुंबईतील विशेष न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष नोंदविण्यात आली. लष्कर-ए-तोयबा ही दहशतवादी संघटना आहे. या संघटनेचा मूळ उद्देश भारताच्या लष्कराशी लढणे आणि काश्मिरींना मदत करणे, हा आहे. भारतामध्ये झालेल्या सर्व दहशतवादी कारवायांमागे एलईटीचा हात आहे, असेही हेडलीने स्पष्टपणे सांगितले. त्याच्या या साक्षीने पाकिस्तानच्या साऱ्या दहशतवादी कारवाया जगासमोर येण्यास मदत होणार आहे.
आपण २६/११च्या हल्ल्यापूर्वी पाकिस्तानहून मुंबईत सात वेळा आलो होतो. या भेटीत काय करायचे आहे, याची पूर्ण कल्पना साजीद मीरने मला दिली होती. मुंबईत गेल्यावर महत्त्वाच्या ठिकाणांची व्हिडीओग्राफी कर, असे मीरने सांगितले होते. शिवाय २६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतरही आपण ७ मार्च २००९ रोजी मुंबईत आलो होतो, असेही हेडलीने न्यायालयात सांगितले.

असा फसला
दोनदा डाव
‘२६/११’पूर्वी मुंबईत सप्टेंबर आणि आॅक्टोबर २००८मध्ये हल्ला करण्याचा कट होता. सप्टेंबरमध्ये कराचीबाहेरून शस्त्रास्त्रे, स्फोटके आणि १० अतिरेक्यांनी भरलेली बोट मुंबईच्या दिशेने रवाना झाली होती. मात्र ही बोट मोठ्या खडकावर आदळल्याने एलईटीचा हा डाव फसला. शस्त्रास्त्रे आणि स्फोटके हरवली, तर १० अतिरेक्यांनी लाइफ जॅकेट घातल्याने ते पुन्हा पाकिस्तानमध्ये परतू शकले. आॅक्टोबरमध्ये हल्ला करण्याचा डाव का फसला? हे मला माहीत नाही. मात्र दोन्ही वेळा कटात सहभागी असलेलेच २६/११च्या हल्ल्यात सहभागी होते. त्या १० जणांनीच मुंबईवर हल्ला केला,’ असे हेडली म्हणाला.

अबू जुंदालविरुद्धचा खटला मजबूत
‘जगाच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच एका अतिरेक्याने व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे परदेशातील न्यायालयात साक्ष दिली आहे. २६/११च्या हल्ल्यामागे असलेल्या योजनेवर हेडली प्रकाशझोत टाकेल. त्यामुळे अबू जुंदालविरुद्धचा खटला आणखी मजबूत होईल, असे अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी म्हटले.


लखवीचा चेहरा जगासमोर
हेडलीच्या या साक्षीमुळे पाकिस्तानचा अतिरेकी चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. या खटल्याचा मास्टर माइंड लखवी याच्यावर पाकिस्तानात या हल्ल्याप्रकरणी खटला सुरू आहे. त्याला शिक्षा देण्यासाठीही हेडलीची साक्ष महत्त्वाची ठरणार आहे.

मंगळवारीही साक्ष
२६/११च्या हल्ल्यासाठी मुंबईची रेकी करणाऱ्या हेडलीची साक्ष अतिशय महत्त्वाची आहे. या हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अबू जुंदालवर सुरू असलेल्या खटल्यात साक्ष घेण्यात येत आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी ७ वाजता या खटल्याची सुनावणी सुरू झाली. अमेरिकन वेळेनुसार मध्यरात्री पाऊण वाजता हेडली न्यायालयासमोर साक्ष देत होता. त्याने प्रत्येक गुन्ह्याची कबुली दिली असून, मंगळवारीसुद्धा साक्ष घेतली जाणार आहे.

हाफीजमुळे बनलो दहशतवादी
एलईटीचा म्होरक्या हाफीज सईदच्या भाषणामुळे आपण एलईटीमध्ये सहभागी झालो. २००२पासून मुजफ्फराबाद (हेडलीच्या भाषेत ‘आझाद काश्मीर’) येथे कोर्सची सुरुवात झाली. येथे शस्त्रास्त्र प्रशिक्षण दिले जात असून, काश्मिरींना मदत करण्यास सांगितले जाते. भारतीय सैन्याने हल्ले केल्यास त्यांचा प्रतिकार करण्यास शिकवले जाते. थेट भारतीय सैन्याविरुद्ध लढण्याची माझी इच्छा होती. मात्र एलईटीतील मुख्य असलेल्या लखवीने माझे वय झाले असल्याने ते काम देण्यास नकार दिला. योग्य वेळी ते कामही दिले जाईल, असे सांगितले गेले, असे हेडलीने साक्षीत म्हटले.

Web Title: Mumbai striking in the third attempt!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.