भुमाता ब्रिगेड त्र्यंबकेश्वर मंदिरात घुसणार
By admin | Published: March 7, 2016 10:27 AM2016-03-07T10:27:46+5:302016-03-07T12:21:02+5:30
महाशिवरात्रीच्या पार्श्वभुमीवर त्र्यंबकेश्वर मंदिरातल्या गाभार्यात महिलांना प्रवेश मिळावा या मागणीसाठी भुमाता ब्रिगेडने मोर्च्याचे आयोजन केले आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
नाशिक, दि. ७ - शनिशिंगणापूर मंदिरात महिलांना प्रवेश मिळावा यासाठी आंदोलन केल्यानंतर भूमाता ब्रिगेडने आपला मोर्चा आता त्र्यंबकेश्वर मंदिराकडे वळवला आहे. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर मंदिरातल्या गाभा-यात महिलांना प्रवेश मिळावा या मागणीसाठी भूमाता ब्रिगेडने मोर्च्याचे आयोजन केले आहे. काशी विश्वेश्वराच्या मंदिरात महिलांना प्रवेश दिला जातो, तर मग त्र्यंबकेश्वरमध्ये का नाही, असा सवाल तृप्ती देसाई यांनी एका पत्रकाद्वारे केला आहे.
भूमाता ब्रिगेडच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या मोर्च्यात १५० ते २०० महिला सहभागी होण्याची शक्यता आहे. पोलीस आम्हाला सहकार्य करत आहेत, मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलं असल्याने आमच्या मोर्च्याला रोखणार नाहीत असा विश्वास तृप्ती देसाई यांनी व्यक्त केला.
या मोर्च्याला हिंदू जनजागृती समिती, सनातन तसंच नगरपरिषदेने विरोध केला आहे. भूमाता ब्रिगेड प्रसिद्दी मिळवण्यासाठी हे करत असल्याचा आरोप मंदिर समितीचे संघटक सुनील घनवट यांनी केला आहे. बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असणाऱ्या त्र्यंबकेश्वर मंदिरात हिंदू महिला व पुरूष यांना प्रवेश आहे. मात्र, गर्भगृहात केवळ सोवळे नसलेल्या अर्धवस्त्रधारी पुरूषांनाच प्रवेश आहे.