११ तासांच्या मॅरेथॉन चौकशीनंतर छगन भुजबळांना अटक

By admin | Published: March 14, 2016 09:53 PM2016-03-14T21:53:40+5:302016-03-14T22:07:20+5:30

महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लाँडरिंग प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची ११ तासांपासून सक्तवसुली संचालनालय (ईडी)कडून मॅरेथॉन चौकशीनंतर अटक करण्यात आली आहे.

Chhagan Bhujbal arrested after 11 hours marathon inquiry | ११ तासांच्या मॅरेथॉन चौकशीनंतर छगन भुजबळांना अटक

११ तासांच्या मॅरेथॉन चौकशीनंतर छगन भुजबळांना अटक

Next
ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. १४  - महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लाँडरिंग प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची ११ तासांच्या मॅरेथॉन चौकशीनंतर सक्तवसुली संचालनालय (ईडी)कडून अटक करण्यात आली आहे. त्यांना उद्या सेशन्स कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
 भुजबळ दक्षिण मुंबईतील ईडीच्या कार्यालयात सकाळी ११ वाजता पोहोचले होते.  त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे वकील होते. ईडी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या २०० कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली होती. 
 
महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने आरोपपत्र दाखल केल्यानंतर भुजबळ यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. छगन भुजबळ यांचे पुतणे समीर सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत, तर मुलगा आ. पंकज यांना १० फेब्रुवारी रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्या दोघांचे पासपोर्टही ताब्यात घेण्यात आले आहेत.
 
आज (सोमवारी) सकाळी आपल्या वकिलासोबत ईडीच्या कार्यालयात हजर झालेल्या भुजबळांनी आपल्या सर्व बँक खात्यांची कागपत्रे तसेच त्यांनी खरेदी केलेल्या विविध मालमत्तांची कागदपत्रे सोबत आणली होती. 
एकूण ८७० कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाच्या अधिका-यांनी भुजबळांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. 
 
ईडीच्या कार्यालयात प्रवेश करण्या आधी छगन भुजबळ यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना माझा राजकीय सूड घेतला जात असून मी त्याचा बळी ठरलो असल्याचे सांगितले. चौकशी करणाऱ्या यंत्रणेला मी सहकार्य करील, असे ते म्हणाले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे २०० हून अधिक कार्यकर्ते भुजबळांना पाठिंबा देण्यासाठी ईडी कार्यालयाबाहेर जमा झाले होते. या सर्व पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ईडीच्या कार्यालयाबाहेर कडेकोट सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला
 
दरम्यान, भुजबळ पांढऱ्या टोयोटा कॅमरी (एमएच -१५-ईएक्स १०६९) कारने आले. या कारची नोंदणी मुंबई एज्युकेशनल ट्रस्टच्या नावावर आहे. भुजबळांसोबत ईडीच्या कार्यालयापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते राहुल नार्वेकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरद पवार या प्रकरणात छगन भुजबळ यांच्यामागे ठामपणे उभे आहेत, असे आव्हाड यांनी यावेळी सांगितले.
 
भुजबळ यांना त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर रक्कम कुठून आली असे ईडीतर्फे विचारण्यात आले. मुलगा पंकज आणि पुतण्या समीर यांनी स्थापन केलेल्या कंपन्यांमध्ये हा पैसा गुंतविण्यात आला, असा आरोप आहे. रोख रक्कम रुग्णवाहिकांमध्ये ठेवण्यात आली होती. नंतर ती मटक्याच्या धंद्यातील हवाला ऑपरेटरकडे नेण्यात आली, कोलकात्याच्या कंपन्या आणि हवाला व्यवहार करणाऱ्याने आपापली भूमिका मान्य केल्यानंतरही हा पैसा कुठून आला हे समीर व पंकज सांगू शकलेले नाहीत. हा पैसा आला कुठून हे शोधून काढण्यासाठी आम्ही चौकशी करीत आहोत, असे सूत्रांनी म्हटले. 
 
भुजबळ यांनी हवाला ऑपरेटरला यात ओढले का आणि ज्या बनावट कंपन्यांनी धनादेश दिले त्यांच्याशी या आॅपरेटरने मध्यस्थी केली का याची आम्ही खातरजमा करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले. समीर आणि पंकज यांना असे व्यवहार मार्गदर्शनाशिवाय व भुजबळ यांच्याकडील पैशांशिवाय करणे शक्य नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. समीर आणि पंकज यांच्या कोणत्याही कंपन्यांमध्ये भुजबळ संचालक नव्हते. महाराष्ट्र सदन आणि कालिना सेंट्रल लायब्ररीच्या बांधकामाचे कंत्राट देण्यासाठी छगन भुजबळ यांनी कंत्राटदाराकडून लाच म्हणून ही रक्कम घेतल्याचा आरोप आहे. 
 
ईडीने परवेश कन्स्ट्रक्शन्सच्या मालकीची ११० कोटी रुपये किमतीची सॉलिटेयर इमारत मागच्या वर्षी जप्त केली. या कन्स्ट्रक्सन्समध्ये समीर आणि पंकज संचालक होते. ईडीने चमणकर इंटरप्रायजेसच्या मालकीची १७.३५ कोटी रुपये किमतीची मालमत्ताही जप्त केली आहे.
 

 

Web Title: Chhagan Bhujbal arrested after 11 hours marathon inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.