राष्ट्रवादीला मोठा झटका

By admin | Published: March 15, 2016 04:35 AM2016-03-15T04:35:33+5:302016-03-15T04:35:33+5:30

शरद पवार यांच्यानंतरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वात मोठे नेते अशी ओळख असलेले आणि मागासवर्गीयांमध्ये मोठे स्थान असलेले अतिशय आक्रमक नेते अशी छगन भुजबळ यांची ओळख आहे.

A big setback for NCP | राष्ट्रवादीला मोठा झटका

राष्ट्रवादीला मोठा झटका

Next

मुंबई : शरद पवार यांच्यानंतरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वात मोठे नेते अशी ओळख असलेले आणि मागासवर्गीयांमध्ये मोठे स्थान असलेले अतिशय आक्रमक नेते अशी छगन भुजबळ यांची ओळख आहे. त्यांची अटक म्हणजे महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसला मोठाच धक्का आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून भुजबळ यांना अटक झाली असल्याने त्यांची बाजू जनतेसमोर कशी मांडणार हाच राष्ट्रवादीसमोर प्रश्न असणार आहे.
छगन भुजबळ सोमवारी सकाळी ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी गेले, तेव्हा त्यांच्यासोबत जितेंद्र आव्हाड आणि राहुल नार्वेकर होते. शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस भुजबळ यांच्यामागे ठामपणे उभा आहे, असे तेव्हा आव्हाड यांनी बोलून दाखवले होते. मात्र त्यांना रात्री अटक होणार, हे निश्चित झाले, तेव्हा तिथे राष्ट्रवादीचा एकही नेता नव्हता.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपणावर अन्याय होत असल्याचे लक्षात येताच, त्यांनी ओबीसी नेता अशी स्वत:ची प्रतिमा निर्माण केली. महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून त्यांनी मागासवर्गीयांची मोठी फौजच स्वत:च्या मागे उभी करून दाखवली. शिवसेनेते असताना रिडल्सच्या प्रश्नावर रिपब्लिकन पार्टीचा भव्य मोर्चा निघाल्यानंतर हुतात्मा चौकाचा काही भाग पाण्याने धुवून काढणारे भुजबळ तेव्हाही वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. शिवसेनेने मंडल आयोगाच्या अमलबजावणीला विरोध केला, तेव्हा मागासवर्गीयांना राखीव जागा मिळाल्याच पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली होती. शिवसेनेने मनोहर जोशी यांना विरोधी पक्ष नेतेपद दिल्यामुळे नाराज झालेले भुजबळ १९९१ साली शिवसेनेला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये दाखल झाले. शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केली, तेव्हा पक्षाच्या महाराष्ट्र शाखेची जबाबदारी त्यांच्यावर होती. याच काळात शिवसैनिकांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. माता रमाबाई आंबेडकर नगरात डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना त्यांनीच करवली असल्याचा आरोपही करण्यात आला होता; पण तो सिद्ध झाला नव्हता.
राष्ट्रवादीमध्ये त्यांचे महत्त्व कमी करण्याचे अनेकदा प्रयत्न झाले. मात्र ओबीसींचा नेता ही त्यांची प्रतिमा पुसून काढणे मात्र राष्ट्रवादीला कधीच जमले नाही. त्याच जोरावर त्यांनी पक्षाचे आणि स्वत:चे आतापर्यंत राजकारण केले आहे.

येवल्यात रास्ता रोको...
येवला विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी व समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी विंचूर चौफुलीवर रात्री रास्ता रोको आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक लोणारी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. भाजपा सरकार व खा. किरीट सोमय्या यांच्याविरोधात निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. आंदोलनामुळे विंचूर चौफुलीवर वाहतुकीची कोंडी होऊन काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

- भुजबळांना अटक झाल्याची बातमी शहराच येताच पोलीस सतर्क झाले होते. जुने नाशिक, द्वारका, मुंबई नाका, लेखानगर, सिडको परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. तसेच सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत रात्रीच्या पोलीस गस्तीमध्येही वाढ करण्यात आली. सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सकाळपासून मुंबईला असल्यामुळे शहरात रात्री उशिरापर्यंत सर्वत्र शुकशुकाट होता.

- सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छगन भुजबळ यांना अटक केल्यानंतर नाशिक पोलीस, प्रशासन सतर्क झाले. पोलिसांनी तातडीने भुजबळ फार्म व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयावर बंदोबस्त वाढविला. त्यामुळे भुजबळ फार्मसह राष्ट्रवादी कार्यालय परिसरात शुकशुकाट होता.

आजही कडेकोट बंदोबस्त
भुजबळ यांच्या अटकेचे पडसाद उमटण्याची शक्यता लक्षात घेता मंगळवारी शहरात सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सचिन गोरे यांनी दिली.

अफवा आणि वृत्तवाहिन्या
संपूर्ण नाशिक जिल्ह्यात अफवांचे पीक आले. सोशल मीडियावरील ग्रुपवर विविध घटना घडल्याचे मेसेज फिरू लागल्याने काही वेळ संभ्रमावस्था निर्माण झाली होती. त्यात वृत्तवाहिन्यांवरील बातम्यांनीही गोंधळात अधिकच भर पडली. नाशिक - पुणे रोडवर कार जाळल्याची रात्री अफवा पसरली. प्रत्यक्षात ही कार काही तांत्रिक कारणांमुळे जळाल्याचे काही वेळानंतर स्पष्ट झाले. या वृत्ताबरोबरच इगतपुरी तालुक्यातील घोटीजवळ महामार्गावर दगडफेक करून दोन बस गाड्या फोडल्याचे वृत्त दूरचित्रवाहिन्यांवरून झळकू लागले; मात्र इगतपुरीपासून नाशिकपर्यंत कोठेही अशा प्रकारची घटना घडली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन
मुंबईत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली. त्यानंतर समता परिषद व राष्ट्रवादीतर्फे कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन करण्यात आले.

Web Title: A big setback for NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.