भुजबळांच्या अटकेचे राज्यात तीव्र पडसाद, अनेक ठिकाणी रास्तारोको
By admin | Published: March 15, 2016 10:36 AM2016-03-15T10:36:48+5:302016-03-15T10:59:19+5:30
राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या अटकेचे राज्यभरात पडसाद उमटले आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १५ - राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या अटकेचे राज्यभरात पडसाद उमटण्यास सुरूवात झाली आहे. भुजबळ यांच्या अटकेमुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक बनले असून राज्यात ठिकठिकाणी रास्तोरोको करून निदर्शने करण्यात येत आहेत.
नाशिकमध्येही या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत, भुजबळ समर्थकांनी येवला येथे रास्ता रोको आंदोलन करत सरकारच्या पुतळ्याचे दहन केले. तर मनमाडमध्ये मुंबई-आग्रा महामार्गावरील मालेगाव-पाटणे गावाजवळ समर्थकांनी रास्तारोको करत वाहतूक अडवून ठेवली आहे. तसेच ओझर येथेही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत मुंबई हायवे रोखून ठेवल्याने धुळ्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.
दरम्यान काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची थोड्याच वेळात बैठक होणार असून राष्ट्रवादीचे आमदार आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत आहेत. तर वरळीतील मेला हॉटेल जंक्शनजवळही मुंबईतील राष्ट्रवादीचे आमदार निदर्शने करणार आहेत.
थोड्याच वेळात भुजबळ यांची कोठडी मिळवण्यासाठी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असून त्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मनी लाँडरिंगच्या आरोपावरून सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) सोमवारी रात्री १० वाजता भुजबळ यांना अटक केली. ते उत्पन्नाच्या स्रोतांची माहिती देऊ न शकल्याने आणि चौकशीमध्ये सहकार्य करीत नसल्याने त्यांना अटक करण्यात आली, असे ईडीच्या अधिकाऱ्यांनी रात्री सांगितले. भुजबळ यांची सोमवार सकाळपासून चौकशी होती, तब्बल ११ तास त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांना ईडीच्या कार्यलयात अटक करण्यात आली.
कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊ नये, आंदोलन नको - शरद पवार
दरम्यान भुजबळ यांच्या अटकेचे पदसाद उमटू लागताच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन करत कोणतेही आंदोलन न करण्याची सूचना केली. हा प्रश्न शांततेने सोडवू, कोणीही कायदा हातात घेऊ नये अशी सूचनाही पवार यांनी कार्यकर्त्यांना दिली.
विधानभवनाच्या पाय-यांवर राष्ट्रवादीच्या नेत्यांचे आंदोलन
भुजबळ यांच्या अटकेचे पडसाद राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही उमटलेले दिसले. काळ्या फिती लावून आलेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पाय-यांवर आंदोलन करत सरकारविरोधात घोषणा दिल्या. ' छगन भुजबळ आगे बढो, हम तुम्हारे साथ है', ' नही चलेगी नही चलेगी, दादगिरी नही चलेगी' , ' फुले, शाहू , आंबेडकरांच्या विचारांचा अपमान करणा-या सरकारचा धिक्कार असो' अशा अनेक घोषणा देत विरोधकांनी भुजबळांच्या अटकेचा निषेध नोंदवला. मात्र अजित पवार, सुनिल तटकरे, पृथ्वीराज चव्हाण हे नेते अनुपस्थित होते.