एकाही वाघाची शिकार नाही !
By admin | Published: March 17, 2016 12:46 AM2016-03-17T00:46:38+5:302016-03-17T00:46:38+5:30
वनविभागातर्फे सर्वच वन्यजिवांच्या संरक्षणाची काळजी घेतली जात आहे. वाघांच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारने विशेष व्याघ्र संरक्षण पथक स्थापन केले आहे. यामुळे गेल्या दोन वर्षांत
वनविभागातर्फे सर्वच वन्यजिवांच्या संरक्षणाची काळजी घेतली जात आहे. वाघांच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारने विशेष व्याघ्र संरक्षण पथक स्थापन केले आहे. यामुळे गेल्या दोन वर्षांत राज्यात एकाही वाघाची शिकार झालेली नाही, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. नवेगाव- नागझिरा अभयारण्यातील प्राण्यांच्या संरक्षणाबाबतचा प्रश्न माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, पतंगराव कदम, मकरंद जाधव, विजय वडेट्टीवार यांनी विचारला होता. यावर उत्तर देताना मुनगंटीवार म्हणाले, ‘वनविभागाने वन्यजीव संरक्षणासाठी योजलेले उपायांची केंद्र सरकारने दखल घेतली आहे. केंद्र सरकारने ताडोबा अंधारी, पेंच व मेळघाट या व्याघ्र प्रकल्पांना ‘उत्तम’ वरून ‘अतिउत्तम’ अशी श्रेणी दिली आहे. नवेगाव- नागझिराचे मूल्यांकन अद्याप झालेले नाही. येत्या काळात या व्याघ्र प्रकल्पाचेही मूल्यांकन केले जाईल. प्राण्यांच्या सुरक्षेसाठी ५६ संरक्षण कुट्या तयार करण्यात आल्या आहेत. ५६४ कॅमेरा टॅप व ६४ ठिकाणी जीपीएस लावले आहेत. वाघांना मुबलक पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी राखीव क्षेत्रांत १३१ कृत्रिम पाणवठे व दोन खोदतळे करण्यात आले आहेत.’ (प्रतिनिधी)
२५ वर्षे असेच प्रश्न विचारा !
अजित पवार, पतंगराव कदम, विजय वडेट्टीवार यासारख्या महत्त्वाच्या नेत्यांनी वाघ संरक्षणाबाबत संवेदनशीलता दाखवत अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे. मी विठ्ठल चरणी प्रार्थना करतो की, पुढील २५ वर्षे त्यांनी असेच लोकहिताचे प्रश्न विचारावे व मला अशीच उत्तरे देण्याची संधी मिळो, असा टोला वनमंत्री मुनगंटीवार यांनी लगावला.