‘भारतमाता की जय’वरून नव्या राजकीय वादाला तोंड

By admin | Published: March 17, 2016 04:58 AM2016-03-17T04:58:37+5:302016-03-17T04:58:37+5:30

‘भारतमाता की जय’वरून देशात नव्या राजकीय वादाला तोंड फुटले असताना आज विधानसभेतही त्याचे पडसाद उमटले. ‘भारतमाता की जय’ म्हणण्यास नकार देणारे एमआयएमचे मुंबईतील

'Bharatmata Ki Jai' faces new political disputes | ‘भारतमाता की जय’वरून नव्या राजकीय वादाला तोंड

‘भारतमाता की जय’वरून नव्या राजकीय वादाला तोंड

Next

विधानसभेत रणकंदन : एमआयएमचे आमदार निलंबित

मुंबई : ‘भारतमाता की जय’वरून देशात नव्या राजकीय वादाला तोंड फुटले असताना आज विधानसभेतही त्याचे पडसाद उमटले. ‘भारतमाता की जय’ म्हणण्यास नकार देणारे एमआयएमचे मुंबईतील आमदार वारिस पठाण यांना विधिमंडळाचे चालू अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले.
राज्यपालांच्या अभिभाषणावर इम्तियाज जलील बोलत असताना त्यांनी स्मारकांच्या उभारणीला विरोध दर्शविला. स्मारकांची गरज काय? हा लोकांच्या घामाचा तसेच कररूपाने मिळणारा पैसा आहे. राज्यात भीषण दुष्काळ असताना स्मारकांवर खर्च कशाला, असा सवाल जलील यांनी केला. जलील यांच्या वक्तव्याने सत्तारूढ बाकावर अस्वस्थता पसरली. छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला विरोध कशासाठी, असा सवाल करीत गदारोळाला सुरुवात झाली. त्यातच भाजपाचे राम कदम यांनी ‘भारतमाता की जय बोलो’ असे आवाहन जलील यांना केले.
‘भारतमाता की जय’ म्हणणार का, अशी विचारणा सत्तापक्षाकडून होत
असताना वारिस पठाण बसल्या जागी म्हणाले की, भारतमाता की जय
म्हटलेच पाहिजे, असे काही घटनेत लिहिलेले नाही. विजय मल्ल्याने देश सोडून पळून जाताना केलेल्या टिष्ट्वटमध्ये भारतमाता की जय म्हटले होते. तसे म्हणणे तुम्हाला अभिप्रेत आहे का? देशावर आमचेही प्रेम आहे. आम्ही जयहिंद म्हणू!
पठाण यांच्या या उत्तराने सभागृहात एकच रणकंदन माजले. भारतमाता की जय म्हणण्यास नकार देणे हा देशाचा आणि देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्यांचा घोर अपमान असून हा देशद्रोह असल्याचे सांगत सत्ताधाऱ्यांसह काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी जलील व पठाण यांना निलंबित करण्याची जोरदार मागणी केली. सर्व सदस्य वेलमध्ये उतरले. कामकाज तब्बल पाच वेळा तहकूब करण्यात आले. या गदारोळातच महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनीही निलंबनाचा आग्रह धरला. शिवसेनेचे गुलाबराव पाटील, भाजपाचे आशिष शेलार, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, अब्दुल सत्तार, राष्ट्रवादीचे भास्कर जाधव यांनी भारतमाता की जय न म्हणणाऱ्यांना या सभागृहात बसण्याचा कोणताही अधिकार नाही, असे ठणकावून सांगितले. सभागृहाचे कामकाज तिसऱ्यांदा तहकूब झाले तेव्हा देशप्रेमाच्या प्रचंड घोषणांचा जोर अधिकच वाढला.
एमआयएम आमदारांना भाजपा-शिवसेनेच्या किमान ५० आमदारांनी घेरून त्वेषाने, ‘इस देश मे रहना होगा, भारतमाता की जय कहना होगा, इस देश मे रहना होगा, वंदे मातरम कहना होगा, ओवेसी हाय हाय’ अशा घोषणांचा धोशा लावला. सभागृहात अत्यंत तणावाचे वातावरण निर्माण
झाले. जलील आणि पठाण जागीच
शांतपणे बसून होते. काहीही होऊ शकेल, अशी तणावाची स्थिती होती पण दोन्ही बाजूंच्या ज्येष्ठ सदस्यांनी सगळ्यांना समजावले. शेवटी संसदीय कामकाज राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी वारिस पठाण यांच्या निलंबनाचा ठराव मांडला. तो बहुमताने मंजूर करण्यात आला. (विशेष प्रतिनिधी)

वारिस पठाण यांना संरक्षण
एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांच्या मुंबईतील घरासमोर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून त्यांनाही पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. पठाण यांनी सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे समजते.

‘कुणी माझ्या मानेवर सुरी ठेवली तरी मी भारतमाता
की जय म्हणणार नाही’, असे एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी लातूर जिल्ह्यात उदगिर येथे झालेल्या सभेत म्हटले होते.

एमआयएमआमदारांची भूमिका चूक
एमआयएमच्या आमदारांची भूमिका चुकीचीच आहे.
भारतमातेचा अपमान कोणीही करता कामा नये, पण या दोघांच्या चुकीच्या भूमिकेमुळे अल्पसंख्याक समुदायाला कोणी लक्ष्य करता कामा नये.
- अब्दुल सत्तार, काँग्रेस

तसे म्हणणे हा माझा अधिकार
ते म्हणतात की, मी ‘भारतमाता की जय’ म्हणणार नाही, कारण राज्यघटनेचे तसे बंधन नाही. शेरवानी आणि टोपी घाल, असेही राज्यघटनेने सांगितलेले नाही. (तरीही ते घालतात). ‘भारतमाता की जय’ म्हणणे हे माझे कर्तव्य आहे की नाही, याच्याशी माझा संबंध नाही. तसे म्हणण्याचा मला हक्क आहे, म्हणून मी ‘भारतमाता की जय’ म्हणणार.
- जावेद अख्तर, ज्येष्ठ गीतकार

राष्ट्रवादाची हीच एकमेव व्याख्या हवी
भारतवासीयांसाठी ‘भारतमाता की जय’ हीच राष्ट्रवादाची एकमेव व्याख्या असायला हवी. इतर सर्व गोष्टी पळवाटा आहेत.
- अनुपम खेर, ज्येष्ठ अभिनेते (टिष्ट्वटरवर)

पश्चिम बंगाल, केरळ, आसाम, तामिळनाडू आणि पुदुच्चेरी येथील निवडणुका तोंडावर आल्या आहेत. या निवडणुका पाहूनच भाजपा आणि एमआयएमने एकत्र येऊन ध्रुवीकरण करण्याच्या उद्देशाने समाजाचे विभाजन करण्याचा प्रयत्न चालविला आहे. - अभिषेक मनू सिंघवी, काँग्रेसचे प्रवक्ते

Web Title: 'Bharatmata Ki Jai' faces new political disputes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.