टँकर न मिळाल्याने पंचायत समिती आवारात परीक्षा!
By Admin | Published: April 5, 2016 12:58 AM2016-04-05T00:58:28+5:302016-04-05T00:58:28+5:30
पिण्याच्या पाण्याचे टँकर न दिल्याने मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टमधील ५०० विद्यार्थ्यांनी सोमवारी (दि. ४) इंदापूर पंचायत समितीच्या आवारात ठिय्या मांडून वार्षिक परीक्षा दिली.
इंदापूर : पिण्याच्या पाण्याचे टँकर न दिल्याने मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टमधील ५०० विद्यार्थ्यांनी सोमवारी (दि. ४) इंदापूर पंचायत समितीच्या आवारात ठिय्या मांडून वार्षिक परीक्षा दिली.
आश्रमशाळेतील मुलांसाठी दररोज दोन पाण्याचे टँकर पाठवा; अन्यथा सोमवारपासून कोणत्याही दिवशी ५१८ विद्यार्थ्यांना तहसील कार्यालय, पंचायत समितीमध्ये पाठवण्यात येईल. तेथेच ते प्रातर्विधी करतील. त्यांची वार्षिक परीक्षा तेथेच घेतली जाईल, असा इशारा ट्रस्टचे अध्यक्ष रत्नाकर मखरे यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता.
मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या वतीने प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय चालवण्यात येते. मागसवर्गीय विद्यार्थी, विद्यार्थिनींची वसतिगृहे आहेत. ३६८ मुले-मुली शिक्षण घेतात. याखेरीज १५० अनिवासी विद्यार्थीही आहेत. या सर्वांना दररोज ३० ते ३५ हजार लिटर पाणी लागते. ते पाणी पुरवण्याची जबाबदारी शासनाची आहे. खडकवासला विभागाचे शाखा अभियंता के. के. देवकाते यांनी तीन वेळा आवश्यकता असताना देखील ट्रस्टच्या पाणी साठवण तलावात पाणी सोडले नाही. पाणी नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. दररोज दोन टँकर पाणी देण्याची सोय करावी; अन्यथा सोमवारनंतर वरील आंदोलन करण्यात येईल, असे या निवेदनात मखरे यांनी म्हटले होते.
निवेदन मिळाल्यानंतर इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिकेत पाटील यांनी आश्रमशाळेवर जाऊन मखरे यांच्याशी चर्चा केली होती. टँकरच्या मागणीची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले होते; मात्र टँकर मिळाले नाहीत. त्यामुळे सोमवारी सकाळी सर्व विद्यार्थी व शिक्षकांना घेऊन मखरे पंचायत समितीमध्ये आले. आवारातच वार्षिक परीक्षा घेतली. दिवसभर विद्यार्थी येथेच थांबणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, विद्यार्थ्यांनी नैसर्गिक विधी करू नयेत, म्हणून पंचायत समितीतील स्वच्छतागृहांना कुलुपे लावण्यात आली होती. (वार्ताहर)