१८ महिन्यांत घटवले १०८ किलो वजन
By admin | Published: April 11, 2016 02:51 AM2016-04-11T02:51:16+5:302016-04-11T02:51:16+5:30
बदलत्या जीवनशैलीमुळे वाढणाऱ्या वजनावर नियंत्रण ठेवणे अनेकांसाठी आव्हान बनले असताना अनंत मुकेश अंबानी याने मात्र, अथक प्रयत्नाने १८ महिन्यांत १०८ किलो वजन घटवले आहे.
मुंबई : बदलत्या जीवनशैलीमुळे वाढणाऱ्या वजनावर नियंत्रण ठेवणे अनेकांसाठी आव्हान बनले असताना अनंत मुकेश अंबानी याने मात्र, अथक प्रयत्नाने १८ महिन्यांत १०८ किलो वजन घटवले आहे. २१व्या वाढदिवशी त्याने स्वत:लाच ‘वेट लॉसचे गिफ्ट’ दिले आहे.
प्रख्यात उद्योगपती मुकेश आणि नीता अंबानी यांचे चिरंजीव अनंत याला लहानपणी अस्थमाचा त्रास होता. त्या वेळी घेतलेल्या औषधांच्या दुष्परिणांमुळे अनंतचे वजन वाढत गेले. इतके की, अनंतला हालचाल करण्यास त्रास होऊ लागला. २१व्या वाढदिवसापर्यंत वजन घटवायचे, असा निश्चिय अनंतने केला. त्या वेळी डॉक्टरांनी त्याला नैसर्गिकरीत्याच वजन कमी करण्याचा सल्ला दिला.
कोणत्याही प्रकारची औषधे न घेता, चालणे, योगा, पाच ते सहा तास व्यायाम आणि खाण्यावर नियंत्रण ठेवणे अशी कठोर दिनचर्या अनंतने स्वीकारली. १८ महिन्यांत अनंतने त्याच्या दिनचर्येत कोणताही बदल केला नाही. तो रोज पाच ते सहा तास व्यायाम करायचा. त्यानंतर योगसाधना झाल्यावर २१ किमी चालायचा. आहारामध्ये साखरेचा शून्य समावेश होता. अल्प प्रमाणात कार्बोहायड्रेट्स आणि त्या जोडीला आवश्यक ते फॅट्स आणि प्रोटीन्स यांचा समावेश करण्यात आला होता.
> सकस अन्न आणि शारीरिक कष्ट
१आयपीएलच्या हंगामांमध्ये अनंत ठळकपणे लोकांच्या समोर येत राहिला. त्याला शरीराबद्दल न्यूनगंड होताच. शेरेबाजी सुरू झाल्यावर तो तीव्र झाला. फिटनेस टे्रनर आंद्रे यांच्याशी तो याविषयी बोलला. त्याच्या हालचाली आणि आहाराचे नियोजन सुरू झाले.
२अनंत मुंबई सोडून जामनगरला गेला. मुंबईत असताना येणारे व्यत्यय त्याला टाळायचे होते.
३शरीर, त्याची संरचना, निर्माण होणारी, वापरली जाणारी ऊर्जा, साठून राहणारी चरबी, अन्न, त्यातले घटक हे सारे समजून घेतले.
४पूर्वतयारीनंतर रोज मोकळ्या हवेत २१ किलोमीटर चालणे, योगासने, वेट टे्रनिंग, कार्डिओ सुरू झाले. कृत्रिम, झटपट उपायांच्या मोहाला बळी न पडता, त्याने स्थूलपणाविरुद्ध आरंभलेली लढाई टप्प्याटप्प्याने जिंकली. ५०० दिवसांत त्याने तब्बल १०८ किलो वजन घटवले.
५या काळात अनंतने त्याची ‘अंबानी’ लाइफस्टाइल दूरच ठेवल्याचे, त्याला मार्गदर्शन करणारे तज्ज्ञ सांगतात. साधे, सकस अन्न आणि शारीरिक कष्ट एवढेच त्याच्या साथीला होते. हे करण्यासाठी वडिलांचे नाव मुकेश अंबानी असणे गरजेचे किंवा पुरेसेही नसते, असे त्यांचे म्हणणे आहे.
> अनंतच्या वजन घटवण्याच्या प्रवासात मी नेहमीच त्याच्याबरोबर होते. त्याची इच्छाशक्ती, अथक प्रयत्न आणि चिकाटीचे दर्शन या काळात मला झाले. आम्ही त्याला सतत प्रोत्साहन देत होतोच. अनंतसाठी ही वाट खूपच खडतर होती, पण त्याने हे करून दाखवले. त्याचा हा १८ महिन्यांचा प्रवास अनेकांना प्रेरणादायी ठरणार आहे.
- नीता अंबानी, उद्योजक