साहित्य संमेलनाची वारी यंदा संत नामदेवांच्या कर्मभूमीत!
By admin | Published: July 2, 2014 04:45 AM2014-07-02T04:45:39+5:302014-07-02T04:45:39+5:30
यंदा प्रथमच मराठी साहित्यिकांची वारी महाराष्ट्र व त्याच्या आजूबाजूच्या राज्यांपासून दूर संत नामदेवांच्या कर्मभूमीत निघणार आहे
पुणे : यंदा प्रथमच मराठी साहित्यिकांची वारी महाराष्ट्र व त्याच्या आजूबाजूच्या राज्यांपासून दूर संत नामदेवांच्या कर्मभूमीत निघणार आहे. ८८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पंजाबमधील घुमान गावात होणार असल्याचे
अ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी जाहीर केले.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे वारे वाहू लागताच स्थळ हा साहित्यिकांपासून ते साहित्यप्रेमींपर्यंत सगळ्यांच्याच उत्सुकतेचा विषय असतो. यंदाच्या संमेलनस्थळाने उत्सुकता शमवत ओढ वाढविण्याचे काम अधिक केल्याची चर्चा आहे. यंदा प्रथमच अ. भा. मराठी साहित्य संमेलनासाठी देशातील १० ठिकाणांहून निमंत्रणे आली होती. त्यात उस्मानाबाद, बडोदा व पंजाब यांचा समावेश होता. त्यापैकी उस्मानाबाद व पंजाब या दोन ठिकाणांची पाहणी स्थळ निवड समितीने केली आणि पंजाबच्या गुरुदासपूर जिल्ह्यातील बाटला तालुक्यामधील घुमान गावाची निवड करण्यात आली.
‘सरहद’ संस्थेचे संजय नहार हे या नियोजित संमेलनाचे संयोजक असून भारत देसडला हे निमंत्रक असतील. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हे संमेलन होण्याची शक्यता असल्याचे डॉ. वैद्य यांनी सांगितले.
घुमान येथे मराठी लोक नसले तरी अमृतसर, चंदीगड, लुधियाना आदी ठिकाणी सुमारे ५००० मराठी लोकसंख्या असल्याचे वैद्य यांनी सांगितले.
नहार म्हणाले, अद्याप अधिकृतरीत्या आम्हाला कळविलेले नाही. मात्र हे संमेलन आयोजित करण्याची संधी आम्हाला मिळत असल्याचा आनंद आहे. घुमानमध्ये विकास व्हावा, तेथे मराठी वाढावी तसेच राष्ट्रीय तीर्थस्थान म्हणून त्या ठिकाणाला ओळख मिळावी, म्हणून आमचे कायमच प्रयत्न होते. (प्रतिनिधी)