सैराट हाऊसफुल, ३ दिवसात १२ कोटींची कमाई
By Admin | Published: May 2, 2016 04:59 PM2016-05-02T16:59:01+5:302016-05-02T17:14:53+5:30
सैराट सिनेमाने ३ दिवसात १२ कोटींचा गल्ला जमवला आहे. मराठी चित्रपटासाठी तिकिट खिडकीवरील ही मोठी ओपनिंग म्हणावे लागेल.
>ऑनलाइन लोकमत
मुंबई. दि. २ : गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेला सैराट हा सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाने तिकिट खिडकीवरील गणित बदललं आहे. कट्यार काळजात घुसली, नटसम्राट, लय भारी या चित्रपटांनी पहिल्या ३ दिवसात तिकिट खिडकीवर केलेल्या कमाईचे रेकॉर्ड मोडीत काढत नवे रेकॉर्ड प्रस्थापित केले. सैराट सिनेमाने ३ दिवसात १२ कोटींचा गल्ला जमवला आहे. मराठी चित्रपटासाठी तिकिट खिडकीवरील ही मोठी ओपनिंग म्हणावे लागेल. रविवारी या चित्रपटाने ४ कोटी ८५ कोटी रुपये कमावले. एका दिवसात ४ कोटींची कमाई करणारा, सैराट हा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे.
सैराटमध्ये रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर ही फ्रेश जोडी या सिनेमात दिसतेय. चित्रपटाच्या गाण्यांनी प्रेषकांच्या मनात आधीच घर केले आहे. येड लागलंय, झिंगाटसारख्या गाण्यावर प्रेक्षकांनी चित्रपटगृहात ताल धरुन दाद दिली आहे.
सैराट हा नागराज मंजुळेचा दुसरा चित्रपट. सैराट आणि फँड्री या दोन्हीचा एकमेकांशी अजिबात संबंध नाही. पण या दोन्ही चित्रपटांचे शेवट हा दोन्हीतला सामायिक धागा आहे. या दोन्हीत 'नागराज टच' आहे.
सैराट ही गोष्ट आहे अर्ची आणि परशाची. एका गावात राहणारे एकमेकांच्या प्रेमात पडतात. अर्ची एका श्रीमंत घराण्यात राहणारी तर परशा अत्यंत गरीब घरात जन्मलेला. या दोघांच्या प्रेमाला त्यांच्या परिवाराचा विरोध आहे. समाजही या दोघांच्या नात्यांना स्वीकारत नाही. आज समाज प्रगती करतोय. जग पुढे चाललंय. विचारसरणी बदलतेय. अनेक जुन्या रुढी परंपरा मागे टाकून प्रगतीच्या दिशेनं प्रत्येक जण वाटचाल करतोय.. अशातच गरीब श्रीमंत, जात- पात, धर्मांच्या नावावर आजही भेद भाव करणारी मानसिकता अस्तित्वात आहे हे या चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
सैराट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी तिकिट खिडकीवर केलेली झिंगाट गर्दी ऑनलाइन लोकमतच्या प्रतिनिधीने केलेले छायाचित्रण