‘नीट’ प्रश्नी विद्यार्थी, पालक आक्रमक

By admin | Published: May 14, 2016 02:46 AM2016-05-14T02:46:14+5:302016-05-14T02:46:14+5:30

नॅशनल इलिजिबिलिटी एन्ट्रन्स टेस्ट’मधून (नीट) किमान यावर्षी महाराष्ट्राला वगळावे, या मागणीसाठी राज्याने केंद्र सरकारवर दबाव आणावा

'Neat' questions students, parents aggressive | ‘नीट’ प्रश्नी विद्यार्थी, पालक आक्रमक

‘नीट’ प्रश्नी विद्यार्थी, पालक आक्रमक

Next

औरंगाबाद / मुंबई/ पुणे : ‘नॅशनल इलिजिबिलिटी एन्ट्रन्स टेस्ट’मधून (नीट) किमान यावर्षी महाराष्ट्राला वगळावे, या मागणीसाठी राज्याने केंद्र सरकारवर दबाव आणावा, अशी मागणी करत हजारो विद्यार्थ्यांनी नांदेड येथे शुक्रवारी निदर्शने केली़ तर, सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी केंद्राने अधिनियम काढण्याची आग्रही मागणी विद्यार्थ्यांच्या संतप्त पालकांनी मुंबईत केली. तथापि, विद्यार्थ्यांना ‘नीट’ द्यावीच लागेल, असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात दिले.
नांदेडमध्ये प्राग़णेश चौगुले यांच्या नेतृत्वाखाली पालक तसेच विद्यार्थी शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांचे गाऱ्हाणे राज्य सरकारमार्फत केंद्राकडे मांडावे, अशी मागणी केली. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, लाखो विद्यार्थ्यांनी वर्षभर अभ्यास करून वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षा (सीईटी) दिली़ मात्र एमबीबीएस व बीडीएसचे प्रवेश एनईईटीद्वारे करण्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे़ या सबंध प्रश्नाबाबत केंद्र सरकारने आजपर्यंत घेतलेली भूमिका विद्यार्थी हिताविरूद्ध होती़ न्यायालयाच्या निर्देशानुसार २४ जुलैची परीक्षा सर्व विद्यार्थ्यांना देता येणार असली तरी केवळ दोन महिन्याच्या कालावधीमध्ये दोन वर्षांचा तोही एनसीईआटीचा अभ्यासक्रम पूर्ण करणे अशक्य आहे़ दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांचे मोठे आर्थिक व मानसिक नुकसान होणार आहे़ त्यामुळे यावर्षीचे मेडिकल प्रवेश सीईटीद्वारेच व्हावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे़
मुंबईच्या आझाद मैदानात संतप्त पालकांनी नीटविरोधात निदर्शने केली. ‘राज्य सरकार या संदर्भात सुरूवातीपासूनच नकारात्मक दिसले आहे. व्हर्च्युअल क्लासेसच्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांना नीटचे प्रशिक्षण देण्याच्या विचारात आहेत. मात्र भारनियमन असलेल्या राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी हे शिक्षण कसे घेणार? यावर सरकारकडे उत्तर नाही. केंद्र सरकारविरोधात शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीही मौन बाळगले आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया पालकांनी दिली. आपला पाल्यांना अभ्यास करण्याचा सल्ला देऊन पुढील लढाई आपणच लढू, असा निर्धार या पालकांनी केला आहे. (प्रतिनिधी)
> सर्वोच्च न्यायालय आपल्या निर्णयावर ठाम असल्याने त्यामुळे विद्यार्थ्यांना नीट परीक्षेला सामोरे जावे लागेल असे दिसतेय, असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पुण्यात दिले. यामुळे केंद्र सरकारने नीटमधून राज्याला सुट देण्याबाबतचा अध्यादेश काढून राज्यातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न केले जाणार नाहीत, अशी शक्यता आहे.
एका कार्यक्रमानंतर पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना ‘नीट’बाबत विचारले असता ते म्हणाले, राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात तिसऱ्यांदा बाजू मांडण्यात येत आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालय आपल्या निर्णयावर ठाम आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ‘नीट’ द्यावी लागेल असे दिसतेय.मानवी साखळी उभारणार
राज्यातील विविध जिल्ह्यांत पालकांची संतप्त निदर्शने सुरू आहेत. शनिवारी पुण्यात उपोषणाच्या माध्यमातून पालक त्यांचा रोष व्यक्त करतील. तर १७ मे रोजी सकाळी १० वाजता मरीन ड्राईव्हपासून गिरगाव चौपाटीपर्यंत मानवी साखळी तयार करून सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांचे पालक सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकारला साकडे घालतील.
राज्यातील पुढाऱ्यांवर बहिष्कार
आझाद मैदानावर निदर्शने करणाऱ्या पालकांची भेट घेण्यासाठी स्थानिक भाजपा आमदार राज पुरोहित दुपारी याठिकाणी आले होते. मात्र राज्यातील कोणत्याही नेत्याशी बोलायची इच्छा नसल्याचे सांगत पालकांनी नेत्यांवर बहिष्कार टाकल्याचे सांगितले.

Web Title: 'Neat' questions students, parents aggressive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.