विमानतळ परिसरात बांधकामबंदी कायम
By admin | Published: May 17, 2016 01:32 AM2016-05-17T01:32:52+5:302016-05-17T01:32:52+5:30
विमानतळाच्या लगतच्या क्षेत्रात बांधकाम करण्यास प्रतिबंध असणाऱ्या सर्व्हे क्रमांकाची अधिसूचना नगर विकास विभागाने जारी केली आहे़
पुणे : हवाई दलाच्या लोहगाव विमानतळ परिसरातील क्षेत्रात यापूर्वी मंजूर केलेल्या विकास नियंत्रण नियमावलीत आता फेरबदल करुन विमानतळाच्या लगतच्या क्षेत्रात बांधकाम करण्यास प्रतिबंध असणाऱ्या सर्व्हे क्रमांकाची अधिसूचना नगर विकास विभागाने जारी केली आहे़ त्यामुळे या परिसरात ९०० मीटर हद्दीसाठी घेतले जाणारे आक्षेप दूर होण्यास मदत होणार आहे़
नगर विकास विभागाने महाराष्ट्र प्रादेशिक नगर नियोजन व नगर रचना अधिनियम कलम २० (४) मध्ये पुणे प्रादेशिक योजनेच्या मंजूर विकास नियंत्रण नियमावलीमध्ये विमानतळाच्या क्षेत्रालगतच्या ९०० मीटर क्षेत्रासंदर्भात फेरबदलासाठी प्रतिबंधित क्षेत्राची ही अधिसूचना काढून त्यांचा समावेश पुणे प्रादेशिक विकास योजनेच्या विकास नियंत्रण नियमावलीत करण्यात आला आहे़ लोहगाव विमानतळ परिसरातील सर्व्हे क्ऱ ९७, ११५, ११७, ११८, ११९, १२०, १२३, १२४ आणि १३४ मधील अंशत: क्षेत्र ११६, १२५, १२६, १३२, ३१८, ३१९ हे संपूर्ण सर्व्हे क्रमांक याशिवाय १३४ चा भाग असणाऱ्या १३४/३/१, १३४/(४) आणि १३४ च्या उर्वरित प्राधिकारी अधिकाऱ्याचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक केले आहे़ या सर्व सर्व्हे क्रमांकातील क्षेत्रात ९०० मीटर हद्दीचा निकष लागू करुन बांधकामास प्रतिबंध करण्यात आला.
विकास नियंत्रण नियमावलीत संबंधित सर्व्हे क्रमांकाचा समावेश करण्यात आल्याने तसेच उर्वरित क्षेत्रातील बांधकाम प्रस्तावासाठी पीएमआरडीएने विमानतळ प्राधिकरणाची परवानगी किंवा ना हरकत प्रमाणपत्र घेण्याचे बंधनकारक केल्याने स्थानिक लोकांचा त्रास वाचणार आहे़
प्राधिकरणाच्या कोणत्या अधिकाऱ्यांकडे जायचे त्यांच्याकडून कोणते प्रमाणपत्र घ्यायचे याची काहीही माहिती या ग्रामस्थांना नव्हती व ते ग्रामस्थांना भेटही देत नव्हते़
(प्रतिनिधी)