तन्मय भटविरुद्धच्या कारवाईवरून पोलिसांसमोर पेच
By admin | Published: May 31, 2016 06:47 AM2016-05-31T06:47:57+5:302016-05-31T06:47:57+5:30
लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांची खिल्ली उडविणारा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता या एआयबी समूहाच्या सह संस्थापकांपैकी एक असलेल्या तन्मय भट याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करता येऊ शकतो का?
डिप्पी वांकाणी, मुंबई
प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर आणि क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांची खिल्ली उडविणारा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता या एआयबी समूहाच्या सह संस्थापकांपैकी एक असलेल्या तन्मय भट याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करता येऊ शकतो का? याबाबत पोलीस चाचपणी करीत असून तेही संभ्रमात आहेत.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, मनसेकडून याबाबत तक्रार आली आहे. त्यातून हे सूचित करण्यात आले आहे की, भादंविच्या कलम ५००नुसार अदखलपात्र गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. त्यानुसार गुन्हा दाखल करण्याबाबत विचार करण्यात येत आहे. तथापि, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी ही वादग्रस्त पोस्ट टिष्ट्वटर आणि फेसबुकवरून हटविण्याचा प्रयत्न सुरू आहे. या अधिकाऱ्याने सांगितले की, आमच्या तपासानुसार हे प्रकरण भादंविच्या कलम ५०० नुसार मानहानीचे आहे. या प्रकरणाचा प्राथमिक तपास पूर्ण करण्यावर आमचा भर आहे. त्यामुळे आम्ही भट यास चौकशीसाठी तत्काळ बोलविणार नाहीत. माहिती तंत्रज्ञानाच्या अधिनियमानुसार या प्रकरणात गुन्हा दाखल केला जाउ शकतो का? याचीही चाचपणी सुरु आहे.
मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, हा व्हिडिओ डिलिट (नष्ट) करण्यासाठी आम्ही फेसबूक आणि यू ट्यूबला विनंती केली आहे. तत्पूर्वी हा प्रमुख पुरावा असलेल्या व्हिडिओचा आम्ही पंचनामा करत आहोत. दरम्यान, एका वकीलाने दिलेल्या माहितीनुसार जोपर्यंत सचिन तेंडुलकर किंवा लता मंगेशकर हे मानहानीच्या या प्रकरणात तक्रार देत नाहीत तोपर्यंत गुन्हा दाखल करता येणार नाही. कारण, या प्रकरणात फक्त हे दोघेच तक्रार देउ शकतात.
.........