कॅबिनेटला दांडी मारून एकनाथ खडसे मुक्ताईनगरात, लाल दिव्याची गाडीही नाकारली
By admin | Published: May 31, 2016 04:23 PM2016-05-31T16:23:11+5:302016-05-31T17:11:20+5:30
महसूलमंत्री एकनाथ खडसेंनी मंगळवारी कॅबिनेट बैठकीला दांडी मारून बैठकीऐवजी स्वत:च्या मतदारसंघातील मुक्ताई देवीच्या यात्रेला हजेरी लावली.
Next
>ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. ३१ - दाऊद फोन कॉल, भोसरी एमआयडीसी जमिनीवरून कुटुंबीयांवर झालेले आरोप अशा अनेक आरोपांच्या फे-यात अडकून पुरते अडचणीत सापडलेले महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याकडील खात्याचा भार लवकरच हलका होण्याची चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी खडसेंनी कॅबिनेट बैठकीला दांडी मारून बैठकीऐवजी स्वत:च्या मतदारसंघातील मुक्ताई देवीच्या यात्रेला हजेरी लावत आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली. विशेष म्हणजे या यात्रेस येण्यासाठी त्यांनी लाल दिव्याची गाडी न वापरता खासगी गाडीचा वापर केल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. 'मंत्रिमंडळाच्या बैठकीपेक्षा मला मुक्ताई देवीचा सोहळा महत्त्वाचा वाटतो, सर्व सोडून मुक्ताईचरणी येण्यास तयार आहे,' असे सूचक वक्तव्यही खडसे यांनी यावेळेस केले असून खडसे लवकरच मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
गेल्या काही दिवसांत खडसेंवर चहूबाजूंनी आरोप होत आहेत. जमीन घोटाळाप्रकरणी पोलिसांत दाखल झालेली तक्रार, दाऊदशी झालेला कथित फोनकॉल, त्या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी करणारी न्यायालयात दाखल झालेली याचिका, जळगावात सिंचन ठेकेदाराशी हातमिळवणी केल्याचा अंजली दमानियांनी केलेला आरोप या सर्व प्रकरणांमुळे खडसे त्रासले आहेत.