एकनाथ खडसेंचं मंत्रीपद जाणार ? अमित शहांनी मागवला अहवाल
By Admin | Published: June 2, 2016 09:26 AM2016-06-02T09:26:07+5:302016-06-02T09:26:07+5:30
भोसरी जमीन खरेदी प्रकरण आणि कथित दाऊद फोन कॉल प्रकरणी गेले काही दिवस वादात असलेले महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचं मंत्रीपद जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे
>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 02 - भोसरी जमीन खरेदी प्रकरण आणि कथित दाऊद फोन कॉल प्रकरणी गेले काही दिवस वादात असलेले महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचं मंत्रीपद जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी या प्रकरणी अहवाल मागवल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत असून एकनाथ खडसेंच्या विषयावर पक्षश्रेष्ठींशी चर्चा होण्याची शक्यता आहे. कौशल्य विकास योजनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांचा हा दिल्ली दौरा असला तरी महसूलमंत्री एकनाथ खडसेंच्या प्रकरणाबाबत दिल्लीत काही खलबतं होतात का? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
महसूलमंत्रिपदासह अनेक खाती सांभाळणा-या एकनाथ खडसेंचं मंत्रिपद काढून घेण्याची मागणी विरोधकांनी जोर लावून धरली होती. अशावेळी खडसे समर्थकांनी त्यांच्या समर्थनार्थ शक्तिप्रदर्शन सुरू केलं होतं. खडसेंच्या समर्थनार्थ जळगावातले भाजपचे 15 नगरसेवक राजीनामा देण्याची घोषणा केली आहे.
दाऊद फोनकॉल, भोसरी एमआयडीसी जमीन आणि त्यांचा कथित पीए गजानन पाटीलच्या लाच मागण्याच्या प्रकरणांमुळे खडसे पुरते अडचणीत सापडले आहेत. विरोधकांनीही खडसेंच्या राजीनाम्याची निवेदनाद्वारे थेट राज्यपालांकडे मागणी केली आहे. मुंबईत कॅबिनेट बैठक असताना ती सोडून खडसे सोमवारी मुक्ताई देवीच्या यात्रेला गेले होते.
एकनाथ खडसे यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या घरुन फोन आल्याचा प्रकरणावर राज्य सरकारने चौकशीचे आदेश दिले होते. हा फोन दाऊदच्या कराचीमधील घरातून एकनाथ खडसे यांच्या मोबाईलवर करण्यात आला होता अशी माहिती मिळाली होती. मात्र एकनाथ खडसे यांनी दाऊदशी आपण कधीच संवाद साधला नसल्याचा दावा केला आहे. वडोदरामधील एका हॅकरने दाऊद इब्राहिमची पत्नी महजबीन शेखच्या नावे असलेल्या चार फोन क्रमांकाची कॉल डिटेल्स काढून इंडिया टुडेच्या हवाली केली होती. या कागदपत्रांवरुन मिळालेल्या माहितीच्या आधारे एक क्रमांक महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या नावावर रजिस्टर आहे.