अंतराळ विज्ञान हे करिअर तुमची वाट पाहतंय.

By admin | Published: October 2, 2014 07:43 PM2014-10-02T19:43:49+5:302014-10-02T19:43:49+5:30

अंतराळ विज्ञानाचा अभ्यास किंवा त्या विषयात करिअर. यासंदर्भात आजही अनेकांचं अज्ञानच आहे.बहुतेकांना वाटतं की, हे काम म्हणजे अंतराळात जाणं, यानात बनून परग्रहावर जाणं, ग्रहतारे शोधणं.

Career Waiting for you from Space Science. | अंतराळ विज्ञान हे करिअर तुमची वाट पाहतंय.

अंतराळ विज्ञान हे करिअर तुमची वाट पाहतंय.

Next

- अनिकेत सुळे

( होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन )

व्हायचंय का तुम्हालाही एखाद्या अंतराळ मोहिमेत सहभागी.

अंतराळ विज्ञानाचा अभ्यास किंवा त्या विषयात करिअर. यासंदर्भात आजही अनेकांचं अज्ञानच आहे. बहुतेकांना वाटतं की, हे काम म्हणजे अंतराळात जाणं, यानात बनून परग्रहावर जाणं, ग्रहतारे शोधणं. म्हणजे हे तर काम अंतराळ विज्ञानात करतातच, पण यापलीकडेही हे क्षेत्र खूप मोठं आणि विस्तारलेलं आहे.
तार्‍यांचा, ग्रहांचा, तिथल्या वातावरणाचा जे अभ्यास करतात, ते शास्त्रज्ञ, त्यांना म्हणायचं अँस्ट्रोनॉट्स. अवकाश शास्त्रज्ञ. त्यासाठी प्युअर सायन्सवाल्यांची विशेषत: भौतिकशास्त्राच्या अभ्यासकांची गरज असते. आणि दुसरी शाखा आहे ती तंत्रज्ञांची. जे अवकाश मोहिमांसाठी आवश्यक ती सगळी तांत्रिक सहायता करणं, स्पेसक्राप्ट्स म्हणजेचं यान डिझाईन करणं, त्यासाठी असलेली सर्व यंत्रणा तयार करणं हे या तंत्रज्ञांचं काम. या दोन अभ्यासशाखा पूर्णत: वेगळ्या असल्या तरी चंद्रमोहीम किंवा मंगळमोहिमेसारख्या मोठय़ा मोहिमांत हे शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ एकत्र काम करतात.
इस्त्रो किंवा नासासारखी संस्था जेव्हा एखादी मोठी मोहीम आखते तेव्हा त्यात शेकडो माणसं काम करत असतात. ही माणसं काही एकच काम करत नाही. एका मोहिमेवर ५00 माणसं काम करत असतील तर प्रत्येकाचं काम, प्रत्येकाची भूमिका, एक्सपरटाईज ठरलेला असतो.
आता मंगळयानाच्या निमित्तानं आपल्या कानावरून मिथेन सेन्सर हा शब्द अनेकदा गेला. म्हणजे काय तर मंगळाजवळ पोहचलेलं यान मंगळभूमीचे जे फोटो काढून पाठवेल, त्या फोटोंचा अभ्यास करुन मंगळाच्या मातीत कुठकुठली खनिजं आहेत, मिथेन आहे का, असेल तर किती हे सारं अभ्यासण्याचं काम खगोल शास्त्रज्ञ करतात. मुलत: ते सारे भौतिकशास्त्राचे पदवीधर असतात. 
भौतिकशास्त्रासह गणितात एमएस्सी करणार्‍यांनाही या क्षेत्रात काम करण्याच्या उत्तम संधी मिळू शकतात.
मात्र अंतराळ विज्ञानाचं हे क्षेत्र खर्‍या अर्थानं कुणाला आज खुलं होत असेल तर ते इंजिनिअर्सना. कुठल्याही विषयाचा इंजिनिअर असो गडगंज पगारासाठी आयटीमध्येच जायचं हा पायंडा आता या मोहिमेच्या यशानंतर तरी मागे पडावा. प्रत्येक शाखेच्या इंजिनिअरला इस्त्रोसारख्या संस्थात काम करण्याची संधी मिळू शकते. केमिकल इंजिनिअर, मेकॅनिकल इंजिनिअर, इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिकल इंजिनिअर आणि कम्प्युटर इंजिनअर यासर्व शाखांच्या इंजिनिअर्सना अंतराळ संशोधन क्षेत्रात काम असतंच. यानाचं डिझाईन, त्यातली इलेक्ट्रिकल सिस्टिम्स, त्याची बांधणं, त्याचं प्रोग्रॅमिंग यासगळ्यांसाठी निष्णात इंजिनिअरची गरज भासतेच.
आता तर या क्षेत्रात पैसेही चांगले मिळतात, आपण देशासाठी पैशाचा आणि सुबत्तेचा त्याग करतो असं म्हणायचे दिवस गेले, त्यामुळे उत्तम करिअरची वाट या क्षेत्रातही अत्युच्च आनंद देऊ शकतेच.!
 
 
 
इस्त्रो’त कामाची संधी कशी मिळते?
इस्त्रोची स्वत:ची एक प्रवेश परीक्षा असते. 
भौतिकशास्त्रात एमएस्सी केलेले आणि सर्व शाखांचे इंजिनिअर आपापल्या विषयाप्रमाणे आणि इस्त्रोला आवश्यकता असेल त्या पदांप्रमाणे ही प्रवेश परीक्षा देऊ शकतात. त्यानंतर प्रत्यक्ष मुलाखतीला बोलावलं जातं. इस्त्रोत निवड करण्याचा प्रमुख निकष हा असतो की तुम्ही जे शिकलात त्यातलं ‘बेसिक’ तुम्हाला पक्कं कळलेलं आहे की नाही, विषय पक्का समजलेलं आहे की नाही. तुमच्या बेसिक कन्सेप्ट्स किती क्लिअर आहेत हे तिथं प्रामुख्यानं तपासलं जातं. त्यामुळे परीक्षेपुरता अभ्यास करणारे तिथं टिकत नाही.
अधिक माहितीसाठी -
http;//www.isro.org/scripts/jobs.aspx
इस्त्रोसारखीच आणखी एक भारतातील संस्था म्हणजे 
नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर,
येथेही करिअरची संधी मिळू शकते,
अधिक माहितीसाठी
http;//www.nrsc.gov.in/
 
संधी कुठली? शिक्षण कुठं?
अंतराळ विज्ञान विषयात संशोधनाला गती मिळावी म्हणून भारतसरकार अनेक प्रयत्न करत आहेत. गुणवान विद्यार्थ्यांना अनेक शिष्यवृत्तीही उपलब्ध आहेत. मुंबई विद्यापीठात सुरू असलेल्या अभ्यासक्रमात जर प्रवेश परीक्षेत उत्तम यश मिळालं तर महिना ५ हजार रुपयांपर्यंत स्कॉलरशिप मिळू शकते. त्यामुळे सर्व शिक्षण मोफत आणि उत्तम कामाची संधी मिळू शकते.
मात्र त्यासाठी लक्षात ठेवण्याची गोष्ट एकच, इथं घोका-ओका चालत नाही. विषयावर तुमचं प्रचंड प्रेम हवं आणि अभ्यास पक्का.
असेच काही कोर्स शिकवणार्‍या या काही संस्था.
या संस्थांच्या वेबसाईटचा अभ्यास करा आणि बारावीनंतर एमएस्सी किंवा इंजिनिअरिंग करणार असाल तर ठरवा, तुम्हाला इथं पुढे शिकायला आवडेल का.
1) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँण्ड रिसर्च 
( पुणे) 
http;//iiserpune.ac.in/
2) नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ  सायन्स  एज्युकेशन अँण्ड रिसर्च
http;//www.niser.ac.in
3) सेण्टर फॉर एक्सलन्स 
इन बेसिक सायन्स
http;//cbs.ac.in/
४) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स 
अँण्ड टेक्नॉलॉजी 
http;//www.iist.ac.in/

Web Title: Career Waiting for you from Space Science.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.