लोकमत एक्सक्लुझिव्ह : एकनाथ खडसे आज राजीनामा देणार!

By admin | Published: June 4, 2016 09:51 AM2016-06-04T09:51:27+5:302016-06-04T09:52:51+5:30

भाजपाचे ज्येष्ठ मंत्री एकनाथ खडसे यांना आज राजीनामा देण्यास सांगितले जाणार आहे. काल मध्यरात्री भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक मुंबई झाली.

Lokmat Exclusive: Eknath Khadse to resign today! | लोकमत एक्सक्लुझिव्ह : एकनाथ खडसे आज राजीनामा देणार!

लोकमत एक्सक्लुझिव्ह : एकनाथ खडसे आज राजीनामा देणार!

Next
अतुल कुलकर्णी
मुंबई, दि. ०४ - भाजपाचे ज्येष्ठ मंत्री एकनाथ खडसे यांना आज राजीनामा देण्यास सांगितले जाणार आहे. काल मध्यरात्री भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक मुंबई झाली. दिल्लीहून मोठय़ा प्रमाणावर दबाव आणला गेल्याने राजीनामा देऊन त्यांनी सरकारमधून बाजूला व्हावे, आणि निपक्ष चौकशी होऊ द्यावी असा सूर त्या बैठकीतून निघाल्याचे सांगण्यात आले.
 
( खडसेंची गच्छंती अटळ)
पुण्यातल्या भोसरीच्या जागेची त्यांनी त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावयाच्या नावाने केलेली खरेदी त्यांना भोवली असून मंत्रीपदावर असताना स्वत:च्या खात्याअंतर्गत येणारा विषय त्यांनी स्वहितासाठी वापरल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष अमित शहा यांच्या निदर्शनास आणून दिल्यानेच हा निर्णय झाल्याचे सांगीतले जात आहे. मोदी सरकारला दोन वर्षे पूर्ण झालेली असताना त्याचे सेलिब्रेशन एकीकडे साजरे होत होते तर दुसरीकडे खडसे यांच्यावरील आरोपांमुळे भाजपाची देशभर बदनामी चालू होती. पक्ष एवढा बदनाम कधीच झाला नाही, शिवाय गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने खडसे यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची नावे व फोटो टाकून मुंबईभर पोस्टर लावल्याबद्दल श्रेष्ठींनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे सांगण्यात येत आहे.
काल रात्री केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुंबईत आले. रात्री त्यांनी पक्षाच्या नेत्यांची, मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्याआधी दुपारी वर्षावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह काहींची याच विषयावर चर्चा झाली. फार दिवस हा विषय चालू ठेवणो पक्षासाठी घातक असल्याचे मत सगळ्यावेळी मांडले गेले. सुत्रंनी दिलेल्या माहितीनुसार हा निर्णय काही दिवस आधीच झाला होता, पण विधानपरिषदेच्या निवडणुका बिनविरोध पार पडू द्या असा सूर पक्षात होता. संघाने खडसेंविषयी फार चांगले मत दिले नव्हते. अमित शहा यांनी खडसे प्रकरणी मुख्यमंत्री निर्णय घेतील असे जाहीर केले होते पण मुख्यमंत्र्यांना हा निर्णय दिल्लीतून अपेक्षीत होता. ते दिल्लीत गेले त्याहीवेळी याचे फायदे तोटे काय यावर चर्चा झाली होती. शेवटी नितीन गडकरींनी हे ऑपरेशन पार पाडावे असे ठरले आणि त्यानुसार पुढील सुत्रे हलली. आज सकाळी खडसेंना राजीनामा देण्यास सांगितले जाईल.

 

Web Title: Lokmat Exclusive: Eknath Khadse to resign today!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.