विरोधकांचे आरोप तथ्यहीन, माझ्याविरुद्ध मीडिया ट्रायल - एकनाथ खडसे
By admin | Published: June 4, 2016 01:52 PM2016-06-04T13:52:04+5:302016-06-04T14:30:34+5:30
विरोधकांनी माझ्याविरुद्ध केलेले आरोप तथ्यहीन असून माझी व पक्षाची नाहक बदनामी करण्यात येत आहे,अशी भूमिका एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत मांडली
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ०४ - मी गेल्या ४० वर्षांपासून भारतीय जनता पक्षाच्या भल्यासाठी झटत आहे. या काळात मी अनेक पदं सांभाळली, मात्र बेछूट आरोप करत गेले काही दिवस चालू असलेल्या मीडिया ट्रायलचा अनुभव मी पहिल्यांदाच घेतला. कोणतेही पुरावे द्यायचे नाहीत, नुसते आरोप करायचे यामुळे माझी व भारतीय जनात पक्षाची बदनामी होत आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी, त्यानंतरच सत्य बाहेर येईल, म्हणून मी माझ्या मंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी भूमिका महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
कथित पीएचे लाचखोरी प्रकरण, मोस्ट वॉँटेड दहशतवादी दाऊदचे कॉल प्रकरण, तसेच भोसरीतील जमीन खरेदीप्रकरण अशा अनेक आरोपांच्या गर्तेत अडकलेले भाजपाचे वरिष्ठ नेते व महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी अखेर आज मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आज दुपारी पत्रकार परिषद घेतली. ' खडसेंचे पक्षाच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे, आम्हाला त्याची जाणीव आहे. खडसेंवरील आरोपांमध्ये काही तथ्य नाही, हे आरोप म्हणजे केवळ भाजपा सरकारला बदनाम करण्याचे प्रयत्न आहेत' असे सांगत भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी पक्ष खडसेंच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी एकनाथ खडसेंनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. ' गेल्या ४० वर्षांत मी अनेक मोठ्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं. राजकीय जीवनात खूप संघर्ष केला. पण ४० वर्षांत पहिल्यांदाच अशी मीडिया ट्रायल पाहिली. माझ्यावर करण्यात आलेल्या आरोपांबद्दल कोणाकडेही ठोस पुरावे नाहीत, कोणीच एकही कागदी पुरावा सादर केलेला नाही. मी भोसरीची जागा नियमानुसार खरेदी केली आहे. कुठलाही व्यवहार हा गैरमार्गाने केलेला नाही, असे ते म्हणाले. विरोधक तसेच अंजली दमानिया यांनीही माझ्यावर केलेले आरोप तथ्यहीन असल्याचे खडसे म्हणाले. कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिम याच्याशी झालेला कॉल व त्याच्याशी असलेला संबंध याचेही खडसेंनी खंडन केले. ' मी गेल्या वर्षभरात एकही आंतरराष्ट्रीय कॉल केलेला नाही. हॅकर म्हणजे एक चोरच असतो, त्याच्या म्हणजे एका चोराच्या सांगण्यावरून माझ्यावर आरोप करण्यात आले, पण कोणाकडेही ठोस पुरावा नाहीये, ना तो कोणी सादर केला' असे सांगत पक्षाची आणखी बदनामी होऊ नये यासाठी आपणच पदाचा राजीनामा दिल्याचे खडसेंनी स्पष्ट केले.