अखेर खडसेंचा राजीनामा !

By admin | Published: June 5, 2016 04:28 AM2016-06-05T04:28:20+5:302016-06-05T04:28:20+5:30

गेले काही दिवस विविध आरोपांच्या चक्रव्यूहात सापडलेले महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शनिवारी सकाळी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपुर्द केला. आपल्यावरील सर्व

Finally Khadseen resigns! | अखेर खडसेंचा राजीनामा !

अखेर खडसेंचा राजीनामा !

Next

-  भाजपा समर्थकांना बसला मोठा धक्का

मुंबई : गेले काही दिवस विविध आरोपांच्या चक्रव्यूहात सापडलेले महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शनिवारी सकाळी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपुर्द केला. आपल्यावरील सर्व आरोप निराधार असून, निर्दोषत्व सिद्ध होईपर्यंत मी मंत्रिपदापासून दूर होत आहे, असा नैतिक पवित्राही त्यांनी घेतला. मुख्यमंत्र्यांनी लागलीच खडसे यांचा राजीनामा स्वीकारला असल्याचे सांगत त्यांच्यावरील सर्व आरोपांची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी केली जाईल, असे टिष्ट्वटरवरून जाहीर केले. अवघ्या दीड वर्षातच फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील एका ज्येष्ठ मंत्र्याला भ्रष्टाचाराच्या आरोपावरून राजीनामा द्यावा लागल्याने भाजपा समर्थकांना मोठा धक्का बसला.
शनिवारी सकाळी १०च्या सुमारास खडसे यांनी ‘वर्षा’ बंगला गाठून मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी त्यांना मंत्रिपद सोडण्याबाबत पक्षश्रेष्ठींचा आदेश असल्याचे सांगताच खडसे यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या समवेत पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन राजीनाम्याची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी खडसेंवरील आरोपांची गंभीर दखल घेत ‘निर्दोषत्व सिद्ध होत नाही तोवर मंत्रिपदावर राहणार नाही असे सांगत राजीनामा द्या,’ असा आदेशच त्यांना देण्यात आला होता, असेही सूत्रांनी सांगितले.

राजीनाम्याची ७ कारणे...
- खडसेंचा निकटवर्तीय गजानन पाटील याला ३० कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी झालेली अटक.
- भोसरी; पुणे येथील एमआयडीसीचा कोट्यवधी रुपये किमतीचा भूखंड पत्नीच्या नावे खरेदी केला. व्हीसल ब्लोअर हेमंत गवंडे यांनी पुराव्यासह केलेला आरोप आणि पोलिसात दाखल केलेली तक्रार
- अंजली दमानिया यांनी कुऱ्हा-बडोदा उपसा सिंचन योजनेतील कथित घोटाळ्याच्या चौकशीसाठी आज़ाद मैदानावर आरंभिलेले उपोषण
- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या घरातून खडसेंच्या मोबाइलवर झालेले कथित कॉल्सचे प्रकरण हॅकर मनिष भंगाळे याने बाहेर काढले.
- खडसे यांच्या कार्यालयातील
वादग्रस्त अधिकारी वर्ग
- मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी अधूनमधून उडणारे खटके
- पत्नीला महानंदचे संचालकपद, मुलीकडे जळगाव जिल्हा बँकेचे अध्यक्षपद आणि सूनबाई खासदार. पक्षश्रेष्ठींना ही घराणेशाही खटकली.

जळगावात शिवसेनेचा जल्लोष...
खडसे यांनी राजीनामा देताच जळगाव जिल्ह्यात संमिश्र प्रतिक्रि या उमटल्या. मुक्ताईनगरमध्ये खडसे समर्थकांनी दुकाने बंद पाडली. रस्त्यावर उतरून जाळपोळही केली तर दुसरीकडे जळगावात शिवसैनिकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.

पालखी प्रस्थानाची पूजा मुनगंटीवारांच्या हस्ते ...
आषाढी एकादशीला पंढरपूरच्या पूजेचा मान मुख्यमंत्र्यांना असतो. तर कार्तिकी एकादशीच्या पूजेला उपमुख्यमंत्री जात असत. फडणवीस सरकारमध्ये हा मान खडसे यांना होता. यंदा आषाढीनिमित्तच्या पालखी प्रस्थानाचा मान वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना देण्यात आला आहे. ते २६ जूनला आळंदी येथे तर २७ जूनला देहू येथे प्रस्थानाची पूजा करतील.

आजवरच्या राजकीय जीवनात अनेक चढउतार पाहिले. ४० वर्षांच्या राजकीय जीवनात संघर्ष करत इथवर पोहोचलो. सत्तेत आणि विरोधातही काम केले. पण, ‘मीडिया ट्रायल’द्वारे बेछूट आरोप करून राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रकार पहिल्यांदा अनुभवतो आहे. आरोप झाल्याच्या पहिल्या दिवसापासून मी विरोधकांना पुरावे देण्याचे आव्हान केले होते. पुरावे द्या, मंत्रिपदच काय तर राजकारणातून बाहेर पडण्याची आपली तयारी आहे. मात्र,
अद्याप कोणीही पुरावा दिला नाही. या आरोपांची सखोल चौकशी झाली पाहिजे. आरोप सिद्ध न झाल्यास दिशाभूल करणाऱ्यांवर कारवाई करा.
- एकनाथ खडसे,
माजी मंत्री

खडसे यांनी राजीनामा दिला. मात्र, माझा तो उद्देश नव्हता. त्यांच्या राजीनाम्याने मला कोणताही उत्साह आलेला नाही. दाऊदशी संभाषण केल्या प्रकरणी खडसेंची सीबीआय चौकशी व्हायला हवी. त्यांचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवून सामान्य नागरिकाप्रमाणे त्यांना जेलमध्ये टाकलेले मला पाहायचे आहे.
- मनिष भंगाळे,
इथिकल हॅकर

राजीनामा हा एक भाग झाला. आरोपाची नि:पक्षपाती चौकशी होणे महत्त्वाचे आहे. चौकशी समिती नेमून हायकोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत ठरावीक कालमर्यादेत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांकडून लिखित आश्वासन मिळाल्याने मी उपोषण मागे घेत आहे. मात्र, प्रकरणाचा एसीबी, ईडी व आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेकडून तपास केला जावा.
- अंजली दमानिया, सामाजिक कार्यकर्त्या

भोसरी एमआयडीसी प्रकरणात आपण केलेला आरोप हा नुसता आरोप नव्हता तर तो गुन्हा घडला होता. त्याची कागदपत्रे सादर करून तक्रारही केलेली आहे. हा कायदेशीर लढा आपण सुरूच ठेवणार आहोत. भ्रष्टाचार ही समाजाला लागलेली कीड आहे. त्यातूनच खडसेंसारख्या वृत्ती तयार झालेल्या आहेत.
- हेमंत गवंडे,
बांधकाम व्यावसायिक

Web Title: Finally Khadseen resigns!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.