माजी मंत्री गुरुदास कामत यांचा राजकारण संन्यास!
By admin | Published: June 7, 2016 07:43 AM2016-06-07T07:43:08+5:302016-06-07T07:43:08+5:30
माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस गुरुदास कामत यांनी आज अचानक राजकीय संन्यासाची घोषणा टिष्ट्वटरवरून केली.
मुंबई : माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस गुरुदास कामत यांनी आज अचानक राजकीय संन्यासाची घोषणा टिष्ट्वटरवरून केली. पक्षात नवीन तरुणांना वाव मिळावा, यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे. पुढील वर्षी होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामत यांचा हा निर्णय पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
पाच वेळा खासदार राहिलेले कामत यांनी १० दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन राजीनाम्याची इच्छा व्यक्त केली होती. तशा आशयाचे पत्र त्यांनी सोनिया गांधी व राहुल गांधी यांना पाठविले होते. त्याचे काहीही उत्तर न आल्याने राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय त्यांना कळविला असल्याचे कामत यांनी म्हटले आहे. मुंबई काँग्रेसमध्ये अनेक वर्षे गुरुदास कामत आणि मुरली देवरा यांचे प्रभावी गट कार्यरत होते. सध्याचे मुंबई विभागीय काँग्रेसचे अध्यक्ष माजी खासदार संजय निरुपम आणि कामत यांच्यातील मतभेदही समोर आले आहेत. मध्यंतरी निरुपम यांना हटविणार असल्याच्या बातम्या होत्या; पण काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मुंबई भेटीत निरुपम यांना अभय दिले होते. त्यामुळे नाराज झालेले कामत गेल्या काही दिवसांपासून पक्षापासून लांबच होते.
कामत यांनी एकेकाळी मुंबई एनएसयूआय, मुंबई विभागीय युवक काँग्रेस, अ. भा. युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा असाच अचानक राजीनामा दिल्याचा इतिहास आहे. यूपीएच्या काळात केंद्रीय मंत्रिमंडळाच्या फेरबदलात खाते बदलल्याने नाराज होऊन ते शपथविधी समारंभालाच गेले नव्हते. लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबई मतदारसंघात शिवसेनेचे गजानन कीर्तिकर यांच्याकडून ते पराभूत झाले होते.
प्रिया दत्त यांचा इन्कार
काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त या लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा माध्यमांमध्ये होती. मात्र त्यांनी याबाबत स्पष्टपणे इन्कार केला. प्रिया दत्त यांनी अलीकडे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली होती.