पिकनिक पॉईंट : सौताडा-कपिलधार (बीड)

By Admin | Published: July 4, 2016 01:10 PM2016-07-04T13:10:30+5:302016-07-04T13:16:29+5:30

बीड जिल्ह्यातील सौताडा व कपिलधार हे तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जातात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून, तसेच राज्याबाहेरूनही पावसाळ्यात येथे निसर्गप्रेमी सहलीसाठी येत असता

Picnic Point: Sutada-Kapiladhar (Beed) | पिकनिक पॉईंट : सौताडा-कपिलधार (बीड)

पिकनिक पॉईंट : सौताडा-कपिलधार (बीड)

googlenewsNext

- प्रताप नलावडे
बीड जिल्ह्यातील सौताडा व कपिलधार हे तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जातात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून, तसेच राज्याबाहेरूनही पावसाळ्यात येथे निसर्गप्रेमी सहलीसाठी येत असतात. सौताडा हे धबधब्यासाठी, तर कपिलधार हे मन्मथस्वामींचे समाधीस्थळ व उंचावरून पडणाऱ्या पाण्याच्या धारेसाठी प्रसिद्ध आहे.
कपिलधार
कपिलधारला पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाला असून, सौताडा येथील पर्यटनस्थळाचा प्रस्ताव प्रलंबित आहे. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगतच बीड शहरापासून अवघ्या १३ कि.मी. अंतरावर कपिलधार हे तीर्थक्षेत्र आहे. कपिलमुनींनी ४७० वर्षांपूर्वी या ठिकाणी अनुष्ठान केले होते. तेथे त्यांची समाधी आहे. त्यानंतर मन्मथस्वामींनी येथे संजीवन समाधी घेतली होती. लाखो भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे.
सोलापूरहून येणाऱ्यांसाठी मांजरसुंबा घाटातून कपिलधारला जाता येते, तर बीडहून येणाऱ्यांसाठी घाटापासून स्वतंत्र रस्ता आहे. बीडमधून बसगाड्यांची व्यवस्था आहे. कपिलधारमध्ये येणाऱ्यांना निवासी व्यवस्थेसह जेवणाची सोयही देवस्थानात केली जाते. पावसाळ्यात निसर्गरम्य ठिकाणी जाण्याचा आनंद घेण्यासाठी शाळा-महाविद्यालयांच्या सहली येत असतात. चोहोबाजूंनी डोंगरदऱ्या असून, मध्ये मन्मथस्वामींची समाधी आहे. हेमांडपंथी मंदिरालगत उंचावरून पडणारे धबधबे पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरले आहे. येथे छायाचित्र घेण्यासाठी भाविकांबरोबरच पर्यटकांचीही गर्दी असते. येथे सहकुटुंब मुक्कामी राहता येते. थुईथुई नाचणारे मोर, पक्ष्यांच्या किलबिलाट व निसर्गसौंदर्याची मुक्त उधळण अशा आकर्षक वातावरणाचा आनंद लुटण्याची पर्यटकांना सुवर्णसंधी आहे. कार्तिकी पौर्णिमा, श्रावण महिन्यात व माघ शु. पंचमीला येथे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतात, असे पुजारी विश्वनाथ अप्पा सलगरकर यांनी सांगितले.

   सौताडा
सौताडा हे पाटोदा तालुक्यातील तीर्थक्षेत्र असून, श्रीक्षेत्र रामेश्वराचे येथे मंदिर आहे. मंदिराजवळ ७०० फूट खोल दरीत धबधब्यातील पाणी पडते. पावसाळ्यात येथील निसर्गसौंदर्य नयनरम्य असते. त्यामुळे येथे हजारो भाविक गर्दी करतात. महाशिवरात्रीला येथे धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. श्रावणातील प्रत्येक सोमवारी हजारो भाविक दर्शनाचा लाभ घेतात.
बीड-अहमदनगर राज्यरस्त्यालगत सौताडा हे गाव वसलेले आहे. पाटोद्यापासून त्याचे अंतर १७ कि.मी. आहे. औरंगाबादहून बीड-पाटोदा मार्गे सौताड्याला जाता येईल. मुंबईवरून यायचे असेल तर अहमदनगर, जामखेडमार्गे सौताडा लागते. बीड व नगर जिल्ह्याच्या सीमेवर हे गाव असल्याने दोन्ही जिल्ह्यातील पर्यटकांना सोयीचे ठरते. येथे मुक्कामी राहण्याची व्यवस्था नाही; परंतु नजिकच्या हॉटेल, लॉजिंगमध्ये राहून पर्यटनाचा आनंद घेता येऊ शकतो. खोल दरीत रामेश्वराचे मंदिर असून, चोहोबाजूंनी निसर्गरम्य वातावरण आहे. पावसाळ्यात हा परिसर हिरवा शालू पांघरून पर्यटकांचे मन मोहून घेतो. वन विभागाने चोहोबाजूला वृक्ष लागवड करून नैसर्गिक सौंदर्य जोपासले आहे. मंदिराजवळ वेदशिक्षण देणारी संस्था आहे. त्यात ४० मुले निवासी वैदिक शिक्षण घेत आहेत, असे पुजारी पांडूदेवा देशमुख म्हणाले.
सीता व राम हे वनवासात असताना सौताड्याला आले होते. सीतेला तहान लागल्यानंतर रामाने बाण मारला. त्यानंतर धबधब्याची निर्मिती झाली, अशी पौराणिक आख्यायिका आहे. या ठिकाणी सीतेची न्हाणी असून, ती इतिहासाची साक्ष ठरली आहे.

 

  आणखी वाचा :

(मुंबईजवळचे पावसाळी पिकनिक पॉईंट्स)

(पिकनिक पॉईंट्स - पहा नगर जिल्ह्याचे ‘कश्मीर’)

 

 

(पिकनिक पॉईंट्स : म्हैसमाळ.. मराठवाड्याचे ‘महाबळेश्वर’)

(पिकनिक पॉईंट : अकोला- आकोट)

( पिकनिक पॉईंट : हाजरा फॉल (गोंदिया) )

(नागपूरमधील पिकनिक पॉईंट्स)

  •  

 

  •  

 

  •  

 

  •  

 

Web Title: Picnic Point: Sutada-Kapiladhar (Beed)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.