VIDEO : अकलुजच्या निहालची आता एव्हरेस्ट शिखरावर नजर
By admin | Published: July 26, 2016 02:26 PM2016-07-26T14:26:31+5:302016-07-26T14:43:02+5:30
हिमाचल प्रदेशातील मनाली सारख्या बर्फाळ भागातील रक्त गोठवणा-या थंडीत अकलुजच्या निहाल अशपाक बागवान या गिर्यारोहकाने सुमारे 20 हजार फूट उंचीच्या पर्वतरांगेवर धाडसाने चढाई केली.
ऑनलाइन लोकमत
अकलुज, दि. २६ - हिमाचल प्रदेशातील मनाली सारख्या बर्फाळ भागातील रक्त गोठवणा-या थंडीत अकलुजच्या निहाल अशपाक बागवान या गिर्यारोहकाने सुमारे 20 हजार 270 फुटी उंचीची अवघड अशी पर्वत रांग धाडसाने चढाई करीत सी.बी.(चंद्रभागा)9 ही मोहिम यशस्वीपणे फत्ते केली आहे.आता त्याची नजर माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करण्याच्या मोहिमेकडे लागली आहे.
अकलुज येथील निहाल बागवान या युवकाने एव्हरेस्ट वीर आनंद बनसोडे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवुन गेली 3 वर्षापासुन माऊंट एव्हरेस्ट शिखर गाठण्यासाठी आनंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गिर्यारोहणाचे धडे घेण्यास प्रारंभ केला असुन त्याने सिंहगड व कळसुबाईचा शिखर सर करीत एव्हरेस्ट मोहिमे च्या दिशेने वाटचाल करताना पुर्व तयारीसाठी बेसिक व अॅडव्हान्स कोर्सेस केले.एव्हरेस्ट मोहिमेसाठी गिर्यारोहणातील अनुभवाकरीता सुमारे 6 हजार मीटर (20 हजार फुट)उंचीवरील दोन शिखरे पार करणे अवश्यक होते त्यापैकी गतवर्षी त्याने 6 अक्टोंबर रोजी लेह लडाखच्या बर्फाळ भागातील स्टाॅक कांगरी हि 20 हजार 186 फुट उंचीची मोहिम फत्ते केली.त्यानंतर त्याने मनाली लेह हायवे वरील मनाली पासुन 225 कि.मी.वर असणारी सी.बी.(चंद्रभागा)9 या 20 हजार 270 फुट उंचीच्या बर्फाळ शिखर सर करण्याची मोहिम आखली.
खा.विजयसिंह मोहिते पाटील व जि प पक्षनेते धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडुन शुभेच्छा व राष्ट्रिय तिरंगा ध्वज स्विकारुन 9 जुलैला अकलुजहुन प्रस्थान केले 13 जुलैला निहाल मनालीला पोहचुन त्याने 15 जुलैला पश्चिम बंगालच्या टिममधील नऊ सहका-यांच्या समवेत सुब्रोतो चक्रवर्ती यांच्या नेतृत्वाखाली सी.बी.9 या मोहिमेस प्रारंभ केला. या मोहिमेत अत्यंत अवघड परस्थिती वाटचाल करताना 5 साथीदार गळाठल्यानंतर निहालने मोहिम फत्ते करण्याच्या निश्चियाची मनात गाठ बांधुन सहकारी सुब्रोत चक्रवर्ती,सौरभ बॅनर्जी, पार्थ दत्तो व अजय चौधरी समवेत मोठ्या प्रयासाने सी.बी.9 ही मोहिम 21 जुलैला सकाळी 8 वा.55 मि.नी तिरंगा फडकावुन यशस्वी केली असुन मोठ्या दोन मोहिमा फत्ते झाल्यानंतर आता निहाल बागवान याला माऊंट एव्हरेस्ट शिखर 2017 सालात सर करण्याचे वेध लागले आहेत. त्याच्या सी बी 9 यशस्वी मोहिमेचे जिल्हा परिषद पक्षनेते धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह अकलुजकरांनी अभिनंदन केले.