माळीणची दुर्घटना पाहून सुन्न झालो
By admin | Published: July 30, 2016 12:04 AM2016-07-30T00:04:26+5:302016-07-30T00:04:26+5:30
सकाळी साडे नऊ वाजता माळीणमध्ये पोहोचलो. समोरचे दृश्य पाहून सुन्न झालो.
निलेश काण्णव/ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 29 - सकाळी साडे नऊ वाजता माळीणमध्ये पोहोचलो. समोरचे दृश्य पाहून सुन्न झालो. पूर्वी या गावामध्ये आलो होतो त्यामुळे समजले की डोंगर कोसळून गावच गडप झाले आहे. किमान दीडशे लोक मृत्यूमुखी पडलेले असणार. काही वाचले असतील तर त्यांना मदत मिळाली पाहिजे. गावात रेंज नव्हती. हे सगळ्यांना समजले पाहिजे म्हणून पळत सुटलो... पण एका वायरमनची गाडी मिळाली. चार किलोमीटरवर एका कड्यावर रेंज आहे माहित होते. त्यानंतर मदत सुरू झाली.
माळीण दुर्घटनेला शनिवारी दोन वर्षे पूर्ण होत आहेत. घटनास्थळी सर्वात पहिल्यांदा पोहोचलेले निलेश काण्णव यांना अजूनही ते दृश्य आठवले की अंगावर शहारे येतात. निलेश यांनी लोकमतला पाठविलेल्या फोटोने माळीण दुर्घटनेची माहिती जगापुढे आली. देशातील सर्व माध्यमांनी हा फोटो वापरला होता.
निलेश सांगतात, त्या दिवशी धो धो पाउस पडत होता. एका पोलिसाचा फोन आला की माळीणमध्ये काही घडल्याचं समजलंय का? चौकशी करण्यासाठी चौकात गेलो. तर माळीणमध्ये काही तरी घडल्याचं समजलं. त्याचवेळी घोडेगावमधून तहसीलदार बी. जी. गोरे, गटविकास अधिकारी विवेक इलमे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर हे माळीणकडे निघाले. लोकमतची चाकणला बैठक होती. त्यामुळे आॅफिसला विचारले की माळीणला दरड कोसळलीय, तिकडे जाऊ की बैठकीस येऊ. आॅफिसमधून सांगण्यात आले की तातडीने माळीणला जा.
सुमारे एक तासात माळीणला पोहोचलो. बरोबरच्या कोणीच गाव कधी पाहिले नव्हते. मला मात्र माहीत होते की शाळेच्या शेजारीच गाव वसले आहे. शाळेची इमारत दिसत होाती. मात्र गाव डोंगराखाली गडप झाले होते. काय करावे सुचेनाच. शेकडो लोक गेली असल्याची कल्पना आली. मोबाईलमध्ये फोटो काढत होतो, पण हात थरथरत होता. गाव कुठे गेले, आता पुढे काय आणि कसे करायचे हा मोठा प्रश्न अधिका-यांसमोर होता. मोबाईलला रेंज नव्हती. मला माहीत होते की कोंढरे घाटातील एका कड्यावर मोबाईलवर रेंज येते. पळत सुटावेसे वाटले पण त्याच वेळी लाईट बंद करण्यासाठी आलेला वायरमन दिसला. त्याला विनंती करून गाडी घेतली. विनोद पवार हे पोलीस कर्मचारी माझ्याबरोबर आले. पाऊस कोसळतच होता. तरीही फोन करून तहसील कार्यालय, पोलिसांना कळविले. पण घटनेची भीषणता फोटोशिवाय कळणार नाही. मोबाईलला इंटरनेट कनेक्ट होईल, असे वाटत नव्हते. व्हॉट्सअॅप सुरू केले. स्पीड नसल्यामुळे अतिशय धिम्या गतीने चालत होते.
त्याच वेळी अचानक पूर्वीचे प्रांत अधिकारी गजानन पाटील यांचा फोन आला. तू कुठे आहेस असे विचारले, माळीणमध्ये आहे असे सांगताच त्यांनी अजित पवार यांच्याकडे फोन दिला. यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात त्यांच्या समोर बसलेल्या सर्वांना पुढे मोबाईलचा स्पिकर सुरू करून माझ्याकडून दुर्घटना समजून घेतली. त्यावेळी मी दुर्घटनेत जखमी कमी आहेत, मात्र मृतांची संख्या मोठी असून ढिगारा उपसण्यासाठी मशिनरी आणि माणसांची आवश्यकता असल्याचे त्यांना सांगितले होते. त्यांनीही रुग्णवाहिका पाठविल्या आहेत, डॉक्टरांची टीम येत आहे, मशिनरी पाठवित आहोत. मुख्यमंत्री व मी स्वत: दुपारी माळीणला येणार असल्याचे सांगितले.
बातमीदार म्हणून माझे कर्तव्य मी बजावले होते. नंतर तातडीने पुन्हा घटनास्थळी पोहोचून मदतकार्यात झोकून दिले. ढिगा-याखाली गाडले गेलेल्या लोकांचे मृतदेह बाहेर काढण्यात अनेक स्थानिक तरुण झटले होते. यामध्ये अडिवरे, डिंभा, शिनोली, घोडेगाव येथून आलेल्या तरुणांचा सहभाग होता. काही मृतदेह ढिगा-यात अर्ध्याअवस्थेत गाडलेले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी सगळे प्रयत्न करत होते. वाचलेल्या घरांमधून टिकाव, खोरी, पहारी अशी मिळेल ती हत्यारे घेऊन हे मृतदेह बाहेर काढण्यासाठी तरुण मदत करत होते.
चिखलामुळे ढिगा-यात पाय गुडगाभर रूतत होते, सर्वत्र दलदल पसरली होती. त्यामुळे पायातील चप्पल खाली चिखलातच अडकुन पडायच्या म्हणून माझ्या सह अनेकांनी चपला फेकून दिल्या व अनवानी मदत कार्यात झोकून दिले. यामुळे अनेकांच्या पायांना मोठमोठ्या जखमा झाल्या.