दाऊदच्या भाच्याच्या लग्नावर ‘वॉच’
By admin | Published: August 16, 2016 05:17 AM2016-08-16T05:17:44+5:302016-08-16T05:17:44+5:30
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाचा अलिशाह इब्राहिम-पारकरचे मुंबईतील नागपाडा परिसरात लग्न पार पडणार आहे, तर जूहू येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये स्वागत समारंभ
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाचा अलिशाह इब्राहिम-पारकरचे मुंबईतील नागपाडा परिसरात लग्न पार पडणार आहे, तर जूहू येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये स्वागत समारंभ होणार आहे. यात दाऊद स्वत: उपस्थित राहणार नाही. मात्र, तो स्काइपद्वारे लग्न पाहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या लग्नासाठी दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर हजर राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे गुप्तचर यंत्रणांसह मुंबई पोलिसांची करडी नजर या लग्नावर असणार आहे.
नागपाडा येथील गार्डन हॉल अपार्टमेंटमध्ये अलिशाह वास्तव्यास आहे. तो दाऊदची दिवंगत बहीण हसिना पारकरचा लहान मुलगा आहे. दोन वर्षांपूर्वी डोंगरी परिसरात हसिना पारकरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता, तर गवळी गँगच्या गँगवारमध्ये अलिशाहचे वडील इब्राहिम पारकर यांची हत्या झाली होती. अलिशाह राहत असलेला फ्लॅट हसिनाच्या नावावर आहे.
अलिशाहच्या लग्नपत्रिकेनुसार, १७ आॅगस्ट रोजी त्याचे लग्न पार पडणार आहे. नागपाडा येथील तेली मोहल्ल्यात सकाळी ११ वाजता आयेशा नामक मुलीसोबत त्याचे लग्न होणार आहे. आयेशा एका व्यावसायिकाची मुलगी आहे. त्यानंतर, रात्री ९ वाजता जुहू येथील ट्युलिप स्टार हॉटेलमध्ये स्वागत समारंभ ठेवण्यात आला आहे. लग्नसराईच्या सुरक्षेसाठी आयोजकांनी विशेष बंदोबस्त ठेवल्याचे समजते. या सोहळ््यात निमंत्रितांनाच प्रवेश दिला जाणार आहे. मीडिया प्रतिनिधींनी आतमध्ये शिरू नये, म्हणून बाउंसरचीही
नेमणूक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
१८ डिसेंबर २००४ मध्ये हसिना पारकरचा मोठा मुलगा दानिशचा मुंबईच्या अंजुमन-ए-इस्लाम शाळेत लग्नसोहळा पार पडला होता. त्यामध्येही दाऊद आला नव्हता. त्या वेळी त्याला लग्नाचे व्हिडीओ आणि फोटो पाठविण्यात आले होते. गेल्या वर्षी हसिनाची मुलगी उमैरा हिचा विवाहदेखील वरळीच्या फेयर
बँक्वेट हॉलमध्ये पार पडला होता. यामध्येही काही लोकांनाच निमंत्रण देण्यात आले
होते. (प्रतिनिधी)
काय आहे योजना?
या लग्नासाठी दाऊदचा भाऊ
इक्बाल कासकर उपस्थित राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गुन्ह्यांतून बाहेर आल्यानंतर इक्बाल हा रियल
इस्टेटचा व्यवसाय पाहात आहे. या सोहळ्यात डी-कंपनीची काही खासमखास लोक हजेरी लावण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुप्तचर यंत्रणा,
गुन्हे शाखेसह मुंबई पोलिसांची येथील हालचालींवर करडी नजर राहणार आहे.