यंदाही दहीहंडी मैदानातच फुटणार!

By Admin | Published: August 23, 2016 02:43 AM2016-08-23T02:43:26+5:302016-08-23T02:43:26+5:30

गतवर्षीप्रमाणेच यंदाही रस्त्यावर दहीहंडी उभारणीला परवानगी न देण्याचीच भूमिका पोलिसांनी घेतलेली आहे.

This year, it will be split into a dahi hall! | यंदाही दहीहंडी मैदानातच फुटणार!

यंदाही दहीहंडी मैदानातच फुटणार!

googlenewsNext


नवी मुंबई : गतवर्षीप्रमाणेच यंदाही रस्त्यावर दहीहंडी उभारणीला परवानगी न देण्याचीच भूमिका पोलिसांनी घेतलेली आहे. त्यामुळे यंदाही शहरातल्या अनेक मानाच्या हंड्या मैदानातच फुटणार असून, यंदा प्रथमच बालगोविंदांनाही बंदी घालण्यात आली आहे.
ऐरोलीत सुनील चौगुले स्पोर्ट असो., अनंत प्रतिष्ठान, करण मित्र मंडळ, कोपरखैरणेत वन वैभव कला क्रीडा निकेतन तर वाशीत गणेश मित्र मंडळ यांच्या हंड्या शहरात प्रसिध्द आहेत. त्यापैकी वन वैभव कला क्रीडा निकेतनच्या हंड्या फोडण्यासाठी लागणाऱ्या स्पर्धेमुळे या हंडीला मागील काही वर्षांत विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्याठिकाणच्या हंड्या फोडण्यासाठी मुंबईसह ठाणे, पुणे येथील गोविंदा पथके हजेरी लावत असतात, तर त्यांच्यातली चुरस पाहण्यासाठी नागरिकही हजारोंच्या संख्येने गर्दी करतात. यापैकी बहुतांश हंड्या रस्त्यावर रचल्या जात असल्यामुळे त्याठिकाणच्या मार्गात बदल करावा लागत असे. गतवर्षी प्रथमच पोलिसांच्या प्रयत्नामुळे दहीहंडीच्या दिवशी शहरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला होता. हंड्यांमुळे वाहतूक कोंडी होवून दळणवळण व्यवस्थेवर पडणारा ताण कमी करण्यासाठी रस्त्याऐवजी मैदानात उत्सव साजरा करण्याच्या सूचना पोलिसांनी आयोजकांना केल्या होत्या. त्यानुसार बहुतांश आयोजक मंडळांनी पोलिसांना सकारात्मक प्रतिसाद दिला होता. तर जुन्या व मोठ्या आयोजकांनी मैदान मिळवण्याची बाजी मारल्यामुळे इतर काही आयोजकांनी त्यांच्या हंडी रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. यंदाही शहरात हेच चित्र पहायला मिळणार असून त्याकरिता पोलिसांकडून विभागनिहाय आयोजकांच्या बैठका घेतल्या जात आहेत. मैदानातच हंडीचे आयोजन करून त्याठिकाणच्या सुरक्षेकरिता खबरदारीच्या आवश्यक सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच ध्वनिप्रदूषण टाळण्याचीही खबरदारी घ्यावी, अथवा कारवाईचा इशाराही पोलिसांमार्फत देण्यात आलेला आहे. यंदा प्रथमच सर्वोच्च न्यायालयाने बालगोविंदांना बंदी घातली आहे. शिवाय गोविंदांकडून रचल्या जाणारा थरालाही मर्यादेचे बंधन घातले आहे. यामुळे दहीहंडीच्या निमित्ताने थरारक मानवी मनोरे यंदा पहायला मिळतील की नाही, याकडे प्रेक्षक नागरिकांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
>दहीहंडी आयोजकांसह गोविंदा पथकांनी नियमांचे पालन करण्याच्या सूचना केल्या जात आहेत. याकरिता प्रत्येक पोलीस ठाण्यामार्फत विभागातील दहीहंडी आयोजक व गोविंदा पथकांच्या बैठका घेतल्या जात आहेत. शिवाय गतवर्षीप्रमाणे यंदाही रस्त्याऐवजी मैदानात उत्सव साजरा करण्यास अनेक आयोजक सकारात्मक आहेत. त्यांच्याकडून ध्वनीची मर्यादा ओलांडली जाणार नाही यावरही पोलिसांचे लक्ष असणार आहे.
- धनराज दायमा,
साहाय्यक आयुक्त.

Web Title: This year, it will be split into a dahi hall!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.