थरार की निर्बंध?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2016 06:09 AM2016-08-25T06:09:05+5:302016-08-25T06:09:05+5:30
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पारंपरिक पद्धतीनेच नऊ थरांची हंडी लावण्याचा निर्धार व्यक्त करत, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिलेले आहे.
मुंबई/ठाणे : एकीकडे दहीहंडीची उंची २० फूट ठेवण्याचा आणि बालगोविंदांना बंदीचा आदेश देत, सर्वोच्च न्यायालयाने दहीहंडीवरील निर्बंध कायम ठेवले असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पारंपरिक पद्धतीनेच नऊ थरांची हंडी लावण्याचा निर्धार व्यक्त करत, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिलेले आहे. त्यामुळे गोविंदा पथक आणि आयोजक सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणार की नियम झुगारून थरांच्या थरार कायम ठेवणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
मुळात उच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निमयांचे पालन होतेय की नाही, याची तपासणी करण्यासाठी शासनाने त्रिसदस्यीय समित्या स्थापन केलेल्या नाहीत. त्यामुळे उत्सवात नियमांचे पालन होत आहे की नाही, याची तपासणी कोण करणार? याबाबत संभ्रम आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंदा पथकांकडून रचल्या जाणाऱ्या थरांचे चित्रीकरण करून त्यात दोषी आढळणाऱ्या गोविंदावर कारवाई केली जाईल. मात्र, मुंबईसह नवी मुंबई, ठाणे परिसरात शेकडो आयोजक असून, हजारो गोविंदा पथकांमधून लाखो गोविंदा उत्सवात सामील होतात. त्यांचे चित्रीकरण कसे करणार? आणि
इतक्या मोठ्या संख्येवर कारवाई कशी होणार? हे प्रश्न अद्यापही निरुत्तरीतच आहेत.
>थर २० फुटांचाच - सुप्रीम कोर्ट
दहीहंडी २० फुटांपेक्षा उंच असणार नाही. दहीहंडीसाठी लागणारे मानवी मनोरे २० फुटांच्या वर करता येणार नाहीत, या आपल्या आदेशात बदल करण्यास बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. दहीहंडीचा आयोजकांना हा धक्का आहे. दुुसरीकडे राज्य सरकारनेही आज जीआर काढून, दहीहंडीच्या उत्सवात १८ वर्षांखालील युवकांना वा मुलांना सहभागी होता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे. दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा कायम ठेवताना, त्यातील थरांचा उल्लेख राज्य सरकारने जीआरद्वारे काढला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दहीहंडी होईल.
>राज येण्याबाबत संभ्रम: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे गुरुवारी ठाण्यातील दहीहंडीला येण्याची शक्यता येथील मनसैनिकांकडून व्यक्त केली जात आहे. ठाण्यातील मनसेने राज यांना दहीहंडीला येण्याची विनंती केल्याचे सांगण्यात आले. राज हे स्वत: दहीहंडीला येण्यास फारसे उत्सुक नसल्याचे समजते. खासगी ५३४ तर सार्वजनिक १४८: गुरुवारी दहीहंडीचा उत्सव ठाण्यात सर्वत्र साजरा होणार आहे. ठाणे शहरामध्ये खासगी २६६, तर सार्वजनिक ८१ दहीहंड्या उभारल्या जाणार आहेत, तर वागळे इस्टेटमध्ये खासगी आणि सार्वजनिक अनुक्रमे २६८ आणि ६७ हंड्या बांधण्यात येतील. पुढच्या वर्षी स्वातंत्र्य दिनीच दहीहंडी: पुढच्या वर्षी दहीहंडी तब्बल १० दिवस लवकर येणार असून, १५ आॅगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच दहीहंडी उत्सवही साजरा होणार आहे. १४ आॅगस्टला गोकुळाष्टमी साजरी होईल, अशी माहिती पंचागकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली.
>ठाण्यात मनसेचे फलक
दहीहंडीवरील निर्बंधावर सर्वोच्च न्यायालय ठाम असल्याचे बुधवारी स्पष्ट झाल्यावर ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज ठाकरे यांच्या छायाचित्रासह ‘तुम्ही कामाला लागा, कोर्टाचं काय ते मी बघतो,’ असे न्यायालयाला आव्हान देणारे फलक लावले. पोलिसांनी ते काढायला लावले खरे, पण त्यामुळे गुरुवारी प्रत्यक्ष दहीहंडीच्या उत्सवात न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत, मनसे नवा वाद निर्माण करण्याची चिन्हे आहेत.
>नोटीसनंतर फलक काढले
सर्वोच्च न्यायालयाने दहीहंडीवरील निर्बंध कायम ठेवताच, मनसे अधिक आक्रमक झाली व त्यांनी थेट न्यायालयाला आव्हान देणारे फलक ठाण्यात लावले. त्याला पोलिसांनी आक्षेप घेत, ते काढून टाकण्याबाबत ठाणे महापालिका व मनसेला नोटीस बजावली. बॅनर काढण्याकरिता पोलीस दाखल झाले. मात्र, मनसेने ते स्वत: उतरवले. तशात राज ठाकरे यांनी आव्हानाची भाषा केल्याने, मनसेच्या हंडीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
>नऊ थर आणि ११ लाखांचे बक्षीस
ठाण्यात इतरत्र हंडीचा फारसा उत्साह नसला, तरी मनसेतर्फे भगवती मैदानात होणाऱ्या दहीहंडी उत्सवाची तयारी चार-पाच दिवसांपूर्वीपासून सुरू झाली आहे. शहरातील विविध चौकांसह मैदानात मनसेने फलक लावले आहेत. ‘नऊ थर आणि ११ लाखांचे बक्षीस’ या मनसेच्या बॅनरलाही पोलिसांनी आक्षेप घेतला. मात्र, न्यायालयाच्या निर्णयानुसार दहीहंडीच्या २० फुटांच्या उंचीबाबत भाष्य केले नसल्याचे मनसेचे म्हणणे आहे. - आणखी वृत्त/७
>दरवर्षीप्रमाणेच यंदाही पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा केला जाईल. या आधी पथकाने नऊ थर रचत रेकॉर्ड केला होता. या वर्षी जितक्या थरांचा सराव केला आहे, तितके थर लावले जातील. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांच्या निर्णयाबाबत काही भाष्य करणार नाही. मात्र, उत्सव पारंपरिक प्रकारे साजरा होईल, हे निश्चित आहे.
- अरुण पाटील, प्रशिक्षक-माझगांव ताडवाडी गोविंदा पथक