इवल्याशा जीवांना पेलवेना दप्तराचा भार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2016 01:32 AM2016-08-27T01:32:15+5:302016-08-27T01:32:15+5:30
विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे किती असावे, असा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार समिती नेमण्यात आली होती
पिंपरी : विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे किती असावे, असा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार समिती नेमण्यात आली होती. त्या समितीने मुलांच्या वयाच्या दहा टक्के दप्तराचे ओझे असावे, असा अहवाल दिला़ त्यानुसार सरकारने परिपत्रक काढून विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्याबाबत सूचना दिल्या़ मात्र, अनेक शाळांकडून नियमांची पायमल्ली होत असल्याचे चित्र लोकमतने केलेल्या स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून निदर्शनास आले आहे.
नियमांचे पालन करण्याची जबाबदारी मुख्याध्यापक अािण शाळा व्यवस्थापनाची आहे. शिक्षणाबरोबर मुलांचे दप्तर नियंत्रणात ठेवण्याची जबाबदारी वाढल्यामुळे शिक्षकांची आणि पालकांची चिंता वाढली आहे़ मुलांच्या खांद्यावरील वाढते ओझे कमी करण्यासाठी सरकारने सर्व शाळांना सूचना दिल्या आहेत़ मात्र, शहरातील अनेक शाळांमध्ये सरकारच्या आदेशाला खो दिला जात आहे़ लोकमत टीमने शहरातील विविध शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे ओझे अक्षरश: वजन काटा लावून मोजले़
पहिली ते आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे ओझे त्यांच्या वयाच्या तिप्पट होते़ महानगरपालिके च्या भोसरी येथील महात्मा फु ले विद्यालयातील चौथीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराची पाहणी केली़ या मुलांच्या दप्तराचे ओझे तीन ते साडे पाच किलोच्या दरम्यान आढळले़ पाचवीच्या वर्गात शिकणाऱ्या दप्तराचे ओझे मोजले असता ते पाच किलो आढळून आले़ तर इयत्ता चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे चार किलो भरले़
विद्यार्थ्यांच्या दप्तरात अनेक विषयांच्या वह्या , पुस्तके, पाण्याची बाटली, जेवणाचा डबा असे साहित्य होते़ या दप्तरांच्या ओझ्याविषयी उमेश खेडकर या पालकाशी संवाद साधला असता ते म्हणाले, वह्या, पुस्तके आणि आवश्यक शाळेचे साहित्य पुरवावे लागते़ परिणामी, त्यांच्या दप्तराच्या ओझ्याची कल्पना येत नाही ़ परंतु, ज्या वेळी मुलगा पाठीवरील दप्तराने वाकतो,त्यावेळी त्याला ओझे पेलवत नाही, हे लक्षात येते. महापालिकेच्या छत्रपती शिवाजीमहाराज विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे ओझे त्यांच्या वयाच्या तुलनेत अधिक असल्याचे आढळले़ चौथी आणि सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे मोजले असता, ते दप्तर चार ते सहा किलोच्या दरम्यान होते.शाळेच्या परिसरात मुलांना शाळेत सोडविण्यासाठी आलेल्या पालकांनी मुलांना दप्तराचे ओझे झेपत नाही म्हणून त्यांनी स्वत:च्या खांद्यावर दप्तर घेतले होते़ दिघी कन्या शाळेतील विद्यार्थिनींच्या दप्तराचे ओझे मोजले असता, काहींचे दप्तर तीन किलोच्या आत भरले, तर सातवीच्या विद्यार्थिनींचे दप्तर पाच किलो होते.
वाकड येथील प्रसिद्ध असलेल्या एका खासगी इंग्लिश स्कूलमधील सहावीच्या विद्यार्थिनीच्या दप्तराची तपासणी केली असता, दप्तरात विविध विषयांची चार पुस्तके, पाच प्रॅक्टिकल नोट्स, सहा वह्या, जेवणाचा डबा व पाण्याची बाटली आढळून आली. त्याचे वजन साडेचार किलो भरले. दप्तराच्या एवढ्या वजनासंबंधी त्या विद्यार्थिनीला विचारले असता, वर्गशिक्षकांनी दररोज सर्व विषयांची पुस्तके, नोट्स आणण्याची सक्ती केली आहे.
पिंपरीतील शाळांमध्ये दप्तराचे नियम धाब्यावर
पिंपरी : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांचे शालेय दप्तराचे वजन निश्चित करण्यासाठी राज्य सरकारने उच्चस्तरीय समिती नेमली होती. या समितीने विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याचा विचार करून, मुलाच्या वयाच्या १० टक्के एवढेच दप्तराचे ओझे असावे, असे निश्चित केले होते. यासंबंधी शाळांनाही अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, शाळांकडूनच या निर्णयाची अंमलबजावणी होत नाही.
१३ वर्षांच्या मुलाच्या पाठीवर तब्बल साडेपाच किलो दप्तराचे ओझे असल्याचे लोकमतने केलेल्या पाहणीतून दिसून आले. दप्तराचा भार विद्यार्थ्यांना पेलता येत नसून, यामुळे व्यवस्थित चालताही येत नाही.
पिंपरी गावातील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले विद्यालयातील सातवीच्या वर्गात परीक्षा सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांनी वर्गाबाहेरच दप्तरे ठेवली होती. दोन विद्यार्थी पेपर संपवून वर्गाबाहेर पडताना आढळले. यापैकी एका विद्यार्थ्याशी संवाद साधला असता, त्याने नाव सांगून, वय सांगितले. त्याच्या दप्तराचे वजन केले असता, ५ किलो, ६० गॅ्रम इतके आढळून आले. दप्तरामध्ये चार वह्या, विविध विषयांचे पाच गाइड, दोन पुस्तके, कंपास व जेवणाचा डबा आढळून आला.
दप्तराच्या एवढ्या ओझ्यासंबंधी त्या विद्यार्थ्याला विचारले असता, त्याने गाइडमुळे अभ्यास सोपा होत असल्याचे उत्तर दिले. तसेच शिक्षकही गाइड आणायला परवानगी देतात. कधीही दप्तराची तपासणी करीत नाहीत. मात्र, मला दप्तराच्या ओझ्यामुळे रस्त्यावरून व्यवस्थित चालता येत नसल्याचे विद्यार्थ्याने हसत-हसत उत्तर दिले.
कमला नेहरू कन्या विद्यालय पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पिंपरीतीलच कमला नेहरू कन्या विद्यालयात चौथीच्या वर्गाची पाहणी केली असता, बहुतांश विद्यार्थिनींच्या दप्तरांमध्ये पाटी-पेन्सिल, एक वही, जेवणाचा डबा आणि पाण्याची बाटली होती. तर आठ ते दहा विद्यार्थ्यांची दप्तरे वह्या-पुस्तकांनी व खेळण्यांनी भरलेली दिसली. यापैकी एका नऊवर्षीय विद्यार्थिनीच्या दप्तराचे वजन केले असता, ३ किलो, ८०० ग्रॅम आढळून आले.
या दप्तरात तीन वह्या, पाटी, कंपास, जेवणाचा डबा, पाण्याची बाटली आणि तिचे खेळण्याचे साहित्य आढळून आले. दप्तराच्या एवढ्या वजनासंबंधी त्या मुलीला विचारले असता, तिने हे सर्व दप्तर दररोज शाळेत घेऊन जाते. कधी-कधी पाठ दुखत असल्याचे उत्तर दिले.