नांदेडमध्येही मराठा समाजाचा नि:शब्द हुंकार!
By admin | Published: September 19, 2016 05:58 AM2016-09-19T05:58:05+5:302016-09-19T05:58:05+5:30
सकल मराठा समाजाचा नि:शब्द हुंकार रविवारी नांदेडकरांनीदेखील अनुभवला़
नांदेड : सकल मराठा समाजाचा नि:शब्द हुंकार रविवारी नांदेडकरांनीदेखील अनुभवला़ लाखोंच्या संख्येत निघालेल्या या अभूतपूर्व मूकमोर्चात अबालवृद्धांसह महिलांची संख्या लक्षणीय होती. अत्यंत नियोजनबद्ध निघालेल्या या मोर्चाने नांदेड शहर अक्षरश: गजबजून गेले होते.
औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, परभणी व हिंगोलीपाठोपाठ निघालेल्या नांदेडच्या या मोर्चाने आजवरच्या गर्दीचे सर्व विक्रम मोडले़ कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी द्या, अॅट्रॉसिटीचा दुरुपयोग थांबवून या कायद्यात योग्य तो बदल करा, मराठा समाजाला आरक्षण द्या, शेतकऱ्यांना कर्जमाफी व शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना दिलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार परत घ्या, अशा मोर्चेकऱ्यांच्या प्रमुख मागण्या होत्या. अत्यंत नियोजनबद्ध आणि शिस्तीत निघालेल्या या मोर्चाचे नेतृत्व युवती तसेच महिलांनी केले़ प्रारंभी जिजाऊ वंदना झाली़ लाखोंचा जनसमुदाय शांत उभा होता़ शेवटी राष्ट्रगीताने समारोप झाला़ तत्पूर्वी सकल मराठा क्रांती मूकमोर्चाच्या वतीने युवतींनी जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांना निवेदन दिले़ शहरातील रस्ते गर्दीने फुलून गेल्याने साधारणत: सात ते आठ तास शहर जिथल्या तिथे थांबलेले होते. स्वयंसेवकांची फळीही तैनात होती़ त्यामुळे मोर्चा अतिशय सौहार्दपूर्ण झाला.
>आता तालुकास्तरीय मोर्चे
फलटण / गुहागर : सकल मराठा समाजाच्या वतीने लाखोंच्या संख्येने जिल्हास्तरीय मोर्चे निघत असतानाच आता तालुका पातळीवरील मोर्चांनाही सुरुवात झाली असून, रविवारी फलटण (जि. सातारा) व रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथे मोर्चे काढण्यात आले. मोर्चात फलटणबरोबरच आसपासच्या तालुक्यांतीलही मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले.
व्यापाऱ्यांनीही स्वयंस्फूर्तीने फलटण बंद पाळून मोर्चाला पाठिंबा दिला. तर गुहागर येथे रत्नागिरी जिल्ह्यातील पहिलाच मोर्चा असल्याने याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. शिवाजी चौक ते गुहागर पोलीस ठाण्यापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. या वेळी तहसीलदार वैशाली पाटील यांना निवेदन देण्यात आले. मोर्चात एक हजारहून अधिक मराठा समाजबांधव सहभागी झाले होते.
>मोर्चेकरी युवतींच्या भावना
अॅट्रॉसिटीचा दुरुपयोग करून दोन समाजांत तेढ निर्माण केली जाते़ ते रोखण्यास कायद्यात आवश्यक तो बदल करून कायदा आणखी कडक करावा, ज्यामुळे कोणावरही अन्याय होणार नाही. आमचा मोर्चा न्यायासाठी आहे़ कोणाला घाबरवण्यासाठी वा कोणत्या जाती-धर्माविरुद्ध नाही़ हा सत्ताधाऱ्यांविरुद्ध, प्रस्थापितांविरुद्ध समाजाने पुकारलेला एल्गार आहे़
>आरक्षणाचा मुद्दा : मराठा समाजाला आरक्षण द्या, ही मागणी २५ वर्षांपासून करण्यात येत आहे़ या मुद्द्यावर अनेक जण राजकीय स्वार्थ साधत आहेत़ इतकेच नव्हे, सरकारकडून आरक्षणाच्या विषयावर समाजाची घोर फसवणूक झाली आहे़ काढलेला वटहुकूम कायद्याच्या माध्यमातून पुढे येऊ शकला नाही़ त्यामुळे समाजाला आरक्षण देताना ओबीसी प्रवर्गात समावेश करावा, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.
>कोल्हापुरातही एल्गारची तयारी
कोल्हापूर : सकल
मराठा समाजाच्या वतीने
१५ आॅक्टोबरला कोल्हापुरात काढण्यात येणाऱ्या ‘महामूकमोर्चा’त सुमारे
१५ लाख मराठा समाजबांधव रस्त्यावर येतील, असा वज्रनिर्धार रविवारी भरपावसात झालेल्या बैठकीत करण्यात आला. येथील जयप्रभा स्टुडिओ परिसरातील शुभंकरोती मंगल कार्यालयात मोर्चाच्या तयारीसाठी बैठक आयोजित केली होती.
>नेते एकसंध आले
बैठकीत बोलताना खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले, कोल्हापूर ही शिव-शाहूंची भूमी असून, तिचा आदर्श इतर सर्व जिल्ह्यांनी घेतला आहे. त्यामुळे आपली जबाबदारी वाढली आहे. या मोर्चाच्या निमित्ताने सर्व राजकीय नेते एकसंध आले, ही आनंददायी बाब आहे.
>19 सप्टेंबर रोजी अकोला येथे तर २२ सप्टेंबर रोजी अमरावती येथे सकल मराठा क्रांती मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
उच्चांकी गर्दी!
नांदेड येथील मोर्चामध्ये सुमारे १५ लाख समाजबांधव येतील,
अशी अपेक्षा सकल मराठा समाजाने व्यक्त केली होती़ मात्र प्रत्यक्षात
२५ ते ३० लाखांवर लोक मोर्चाला आले होते, असा दावा आयोजकांनी केला.मोर्चात माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय राज्यमंत्री, माजी मंत्री, खासदार, आमदार, माजी खासदार-आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींसह सर्वच पक्ष, संघटनांमधील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़