तृप्ती देसाईंचा 'बिग बॉस'मध्ये सहभागी होण्यास नकार
By Admin | Published: September 22, 2016 09:24 AM2016-09-22T09:24:00+5:302016-09-22T09:24:44+5:30
महिलांच्या मंदिर प्रवेशासाठी लढा देणा-या 'भूमाता ब्रिगेड'च्या तृप्ती देसाईंनी 'बिग बॉस'मध्ये सहभागी होण्यास नकार दिला आहे.
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ - महिलांच्या मंदिर प्रवेशासाठी लढा देणा-या 'भूमाता ब्रिगेड'च्या तृप्ती देसाई या प्रसिद्ध रिअॅलिटी शो 'बिग बॉस'मध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा होती. मात्र देसाई यांनी या कार्यक्रमात सहभागी होण्यास नकार दिला आहे. ' इतर कार्यक्रमांमध्ये व्यस्त असल्याने बिग बॉसमध्ये सहभागी होणे मला शक्य नाही' असे देसाई यांनी स्पष्ट केले आहे.
अभिनेता सलमान खान होस्ट करत असलेल्या ' बिग बॉस'चा १० वा सीझन पुढील महिन्यात येणार असून तृप्ती देसाईंना शोमध्ये सहभागी होण्याबाबत विचारणा करण्यात आली होती. या शोमध्ये नेमही सेलिब्रिटी स्पर्धक सहभागी होतात, मात्र यावेळी शोमध्ये सामान्य जनतेलाही सहभागी होता येणार आहे.
आम्ही महिलांच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याची बिग बॉसनेही दखल घेतली असून त्यांनीच तृप्ती यांना शोमध्ये सहभागी होण्याबाबत विचारण केली होती. गेल्या महिन्यात त्यांची मीटिंगही झाली. मात्र या शोमध्ये सहभागी झाल्यास संपूर्ण ९० दिवस बिग बॉसच्या घरात रहावे लागते, बाहेरच्या जगाशी कोणताही संपर्क ठेवता येत नाही, असे कळल्यानंतर तृप्ती यांनी निर्णयासाठी थोडा वेळ मागितला होता. तसेच या शोमधील ' बिग बॉस' चा आवाज महिलेचा असावा, अशी अटही त्यांनी ठेवलली होती. गेल्या ९ सीझनपासून एका पुरूषाने ही धुरा सांभाळली आहे, मात्र आता ती जबाबजारी महिलेकडे दिल्यास इतर सर्व क्षेत्रांप्रमाणे 'महिला' हे क्षेत्रही गाजवतील असा मला विश्वास वाटतो, असे तृप्ती देसाई म्हणाल्या होत्या.