आता देशी दारुही होणार 'सैराट' आणि 'झिंगाट'
By admin | Published: October 27, 2016 02:25 PM2016-10-27T14:25:47+5:302016-10-27T14:46:04+5:30
मद्यप्रेमींना लवकरच 'सैराट' आणि 'झिंगाट' देशी दारु प्यायला मिळणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने देशा दारु ब्रॅण्डला ही नावे देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 27 - सैराट चित्रपटामुळे दोन शब्द लोकांच्या तोंडी आलेत ते म्हणजे 'सैराट' आणि 'झिंगाट'. फक्त सामान्य नाही तर राजकारणी मंडळीही टीका करताना हा शब्दप्रयोग करताना दिसतात. मराठी चित्रपटसृष्टीला कलाटणी देणा-या सैराट चित्रपटाची दखल आता राज्य उत्पादन शुल्क विभागानेदेखील घेतली आहे. त्यामुळे मद्यप्रेमींना लवकरच'सैराट' आणि 'झिंगाट' देशी दारु प्यायला मिळणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने देशा दारु ब्रॅण्डला ही नावे देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
मिड-डे वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने यासंबंधी सूचना काढली असून कोणाला काही आक्षेप असल्यास पुढील 15 दिवसांत ते नोंदवू शकतात. जर कोणी काही आक्षेप नोंदवला नाही तर हा प्रस्ताव लागू होईल आणि बाजारात 'झिंगाट' आणि 'सैराट' ब्रॅण्ड पाहायला मिळतील.
दरवर्षी एकूण 35 उत्पादन कंपन्या तब्बल 33 कोटी लिटर देशी दारुचं उत्पादन करतात. बनावटी दारुमुळे लोकांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्यानंतर राज्य सरकारने देशी दारुचं उत्पादन आपल्या कार्यकक्षेत घेण्याचा निर्णय घेतला होता. राज्य उत्पादन शुल्क विभाग प्रामुख्याने मद्यार्कयुक्त /अंमली पदार्थांवर उत्पादन शुल्क जमा करण्याचे काम करतो. तसेच अशा मद्यार्कयुक्त पदार्थांवर नियंत्रण ठेवण्याचे कामकाज या विभागामार्फत केले जाते.
याअगोदर दारु ब्रॅण्डना भिंगरी, बॉबी अशी नावे उत्पादन कंपन्यांकडून देण्यात आलेली आहेच. चांगल्या प्रतीच्या देशी दारुचं उत्पादन केलं जावं आणि स्वस्तात विकली जावी यासाठी आमचा प्रयत्न असतो. काही उत्पादन कंपन्यांनी ट्रेडमार्कनुसार ब्रॅण्डची नावे ठेवली आहेत. आम्ही त्यांना मंजुरी देण्याच्या प्रक्रियेत आहोत अशी माहिती अधिका-याने दिली आहे. देशी दारु सर्वात जास्त मुंबईतील उपनगर भागात, पालघर, नागपूर, नाशिक, पुणे आणि सांगली येथे विकली जाते.