नोटा बदलण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा मृत्यू

By admin | Published: November 12, 2016 03:53 AM2016-11-12T03:53:27+5:302016-11-12T03:53:27+5:30

शासनाने पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय अचानक जाहीर केल्याने घाबरून नोटा बदलण्यासाठी गेलेल्या मुलुंडमधील ७३ वर्षीय वृद्धाचा हृदयविकाराच्या झटक्याने

Death of an old man who changed his notes | नोटा बदलण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा मृत्यू

नोटा बदलण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा मृत्यू

Next

मुंबई : शासनाने पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय अचानक जाहीर केल्याने घाबरून नोटा बदलण्यासाठी गेलेल्या मुलुंडमधील ७३ वर्षीय वृद्धाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. घटनेची नोंद करून नवघर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
विश्वनाथ वर्तक सार्वजनिक बांधकाम विभागातून निवृत्त झाले होते. केंद्र सरकारने पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्याने ते चिंतित होते. अशातच गुरुवारपासून बँकांमध्ये या नोटा बदलून मिळत असल्याची माहिती वर्तक यांना समजली. शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजताच स्वत:जवळील पाचशे आणि एक हजाराच्या नोटा घेऊन वर्तक येथील एसबीआय बँकेत बदलण्यासाठी घराबाहेर पडले. नोटा बदलण्यासाठी बँकेच्या बाहेर रांगेत उभे असताना वर्तक यांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन ते जमिनीवर कोसळले. स्थानिकांनी तत्काळ याची माहिती त्यांचा मुलगा अनिरुद्ध याला दिली. डॉॅक्टरांना घेऊन अनिरुद्ध घटनास्थळी पोहोचला. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोहोचलेल्या नवघर पोलिसांनी वर्तक यांना वीर सावरकर रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित करताच पोलिसांनी वर्तक यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून घटनेची नोंद केली. वर्तक यांच्या पश्चात सेवानिवृत्त शिक्षिका पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. घरातील नोटा बदलण्यास घाई करू नका, तसेच या नोटा रद्द झाल्या याचाही ताण घेऊ नका, असे मी वडिलांना सांगितले होते. वडील वयोवृद्ध असल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका आला असून, आपली कोणतीही तक्रार नसल्याचे वर्तक यांचा मुलगा अनिरुद्ध याने या वेळी बोलताना स्पष्ट केले.

Web Title: Death of an old man who changed his notes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.