जनतेचा सर्जिकल स्ट्राइक महागात पडेल - उद्धव ठाकरे

By admin | Published: November 12, 2016 04:32 AM2016-11-12T04:32:43+5:302016-11-12T04:32:43+5:30

कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक नोटाबंदीचा निर्णय घेऊन सर्वसामान्यांची फसवणूक केली आहे

The surgical strike of the masses will fall in the ocean - Uddhav Thackeray | जनतेचा सर्जिकल स्ट्राइक महागात पडेल - उद्धव ठाकरे

जनतेचा सर्जिकल स्ट्राइक महागात पडेल - उद्धव ठाकरे

Next

मुंबई : कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक नोटाबंदीचा निर्णय घेऊन सर्वसामान्यांची फसवणूक केली आहे. काळ्या पैशावर सर्जिकल स्ट्राइक करणाऱ्यांवर एक दिवस सर्वसामान्य जनता जो सर्जिकल स्ट्राइक करेल, तो सरकारला महागात पडेल, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मोदींच्या नोटा बंदीच्या निर्णयावर सडकून टीका केली. काळ्या पैशावर आळा घालण्यासाठी हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटांवर बंदी आणली, पण मग पाचशे, हजार आणि दोन हजाराच्या नोटा का आणता, असा सवालही ठाकरे यांनी केला.

शिवसेना भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना ठाकरे म्हणाले, ज्या लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला अधिकार दिले; त्यांनाच त्रास दिला जात आहे. मोदींनी ‘मन की बात’ करण्याऐवजी ‘धन की बात’ केली खरी, पण ‘जन की बात’ केली नाही. काळा पैसेवाल्यांवर नजर ठेवण्याऐवजी तुम्ही आता सर्वसामान्यांच्या लॉकर्सवरही नजर ठेवणार का, घराघरात कॅमेरे लावणार का, असा सवाल करतानाच बँकेत पैसे भरताना आधारकार्ड दाखवायला सांगताय त्याऐवजी मोदींचा फोटो वापरायला हवा होता, असा टोलाही उद्धव यांनी लगावला. मोदींच्या निर्णयामुळे नेत्यांना आणि काळा पैसेवाल्यांना या निर्णयाचा कसलाच त्रास होत नाही. केवळ सामान्य जनताच भरडली जात आहे. याच सामान्य जनतेने तुम्हाला निवडून दिले आहे. त्यांनी पुढील निवडणुकीत सर्जिकल स्ट्राइक केल्यास फार महागात पडेल, असा इशारा ठाकरे यांनी दिला.

नोटा बंद करण्याचा निर्णय घेण्याआधी पर्यायी व्यवस्था करायला हवी होती. दिवाळीला ज्या लक्ष्मीचे पूजन केले आता ती लक्ष्मीच राहिली नाही. एका फटक्यात नोटा बंद केल्याने एटीएम आणि बँकांसमोर लोकांच्या रांगा लागल्या आहेत. सामान्यांची लग्न रद्द झाली, रुग्णालयात अडचणी येत आहेत. मुलुंड येथे बँकेच्या रांगेतच एका व्यक्तीचा जीव गेला. ज्यांनी नोटा बंद करण्याचा हा निर्णय घेतला तेच या मृत्युला जबाबदार असल्याची टीका उद्धव यांनी केली.

...तर स्वीस बँकेवर स्ट्राईक करा
सामान्य जनतेला त्रास देण्याऐवजी जिथे काळ्या पैशाचा उगम आहे तिथे कारवाई करा. ५६ इंचाची छाती ५६ हजार इंच करा आणि हिम्मत असेल तर स्वीस बँकेवर सर्जिकल स्ट्राईक करुन तिथला काळा पैसा भारतात आणून दाखवा, असे आव्हान ठाकरे यांनी दिले.

मुदतवाढ द्या
सर्वसामान्य जनतेला त्यांच्याकडीले पैसे बदलून घेण्यासाठी मुदतवाढ मिळाली पाहिजे. जोपर्यंत लोकांच्या हातात पैसे येत नाहीत तोपर्यंत सर्व शासकीय सेवा मोफत करण्याची मागणीही ठाकरे यांनी केली.

 

Web Title: The surgical strike of the masses will fall in the ocean - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.